जोपर्यंत मशिदींवर भोंग्यातून अजान दिली जाईल तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार – राज ठाकरे

मुंबई : ४ मे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात त्यांची भूमिका अशीच आक्रमक राहाणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मशिदींवर भोंग्यातून आजान दिली जाईल, तोपर्यंत त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागणार. हा विषय फक्त आजपूरता नाही तर जोपर्यंत यावर निर्णय येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं मनसेचं आंदोलन आगामी काळातही कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘मी सांगितलं होतं की भोंगे खाली उतरवा, पोलिसांना एकच काम आहे का रोज डेसिबल मोजायचं? लोकांनी हेच करायचं का? तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती करा, मात्र माईक आणि लाऊडस्पीकर लागतो कशाला? त्यामुळे हे भोंगे खाली उतरवले पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही, यावर निर्णय लागत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे,’ अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
सरकार सांगतंय आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतोय, मग करायचं असेल तर पूर्ण करा. आजच्या ९२ टक्के मशिदींवर भोंगे लागले नाही, यावरून आम्ही खूश होणार नाही. दिवसभरातील बांग देखील आदेशानुसार त्याच डेसिबलमध्ये लागल्या गेल्या पाहिजे, अन्यथा हनुमान चालीसा लागणार. हा सामाजिक विषय हा धार्मिक विषय नाही, त्यांनी जर तो प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ. कुठेही शांतता बिघडावी, दंगली व्हाव्या अशी आमची अजिबात इच्छा नाही, गरज नाही’, असंही ते म्हणाले.
‘आमची माणसं का पडकत आहेत कळत नाही, तेही मोबाईच्या काळात. माणसं पकडून काय होणार आहे, हे अजूनही ६०-७० च्या दशकातील विचार करत आहेत का? हे कुठल्या काळात जगताहेत मला माहित नाही. मला हेच सांगायचं आहे की हा विषय एक दिवसाचा नाही, ज्या-ज्या मशिदींमधील मौलवी ऐकणार नाही, जिकडे लाऊडस्पीकर लागतील तिथे हनुमान चालीसा त्याच्या दुप्पट आवाजात लागली पाहिजे’, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
मी पोलिसांच्या कारवाईची वाट पाहातोय. मुंबईचे पोलीस या १३५ मशिदींवर काय कारवाई करतात, करणार आहेत की नाही, याची मी वाट पाहात आहेत. ते त्यांच्या धर्माला घट्ट राहाणार असतील तर आम्हीही आमच्या धर्माला घट्ट राहावं लागेल. याचा पोलिसांनी, सरकारने विचार करावा. राज्यात शांतता राहावी, भोंगे बंद व्हावे. जेव्हा तुम्हाला सणांना लागतात, सभेला लागतात, इतर कारणाला लागतात तेव्हा आपण समजू शकतो. पण, ३६५ दिवस सकाळी उठल्यापासून दिवसभर ऐकवत असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय ते. याचा महिलांना, विद्यार्थ्यांना, आजारी वृद्धांना त्रास होतोय. माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा आहे. हा विषय आजचा नाही कायमचा आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

Leave a Reply