केंद्र सरकार शहरांचे नाव बदलण्याच्या प्रक्रियेला उशीर का करत आहे – सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : ४ मे – गेल्या काही वर्षांपासून, शहरांची नावे बदलून त्यांची प्राचीन नावं ठेवण्याची मागणी वाढत आहे. भाजपच्या राजवटीत हे काम वेगाने होत आहे. अनेक शहरांची नावेही बदलण्यात आली आहेत. यामध्ये अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या अशी उदाहरणं आहेत. याच क्रमाने गुजरातची राजधानी अहमदाबादचे नाव बदलून कर्णावती करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. गेल्या मार्चमध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली आणि राजधानीचे नाव कर्णावती ठेवण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली. आता भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नामकरणाच्या प्रश्नावरून स्व-पक्षाची कानउघडणी केली आहे. अहमदाबाद शहराचे नाव बदलून कर्णावती न केल्याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्वत: ते सुचवले होते, पण आता ते स्वतः ते करत नाहीत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
“काल मी संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये घालवला (ज्याचे नाव अद्याप कर्णावती झाले नाही). मोदी पंतप्रधान म्हणून अंमलबजावणी करण्यास नकार देत आहेत, जे त्यांनी २०१३ मध्ये मुख्यमंत्री असताना केंद्राला “कर्णावती” म्हणून नाव देण्यास सुचवले होते. चारही कार्यक्रमात जावई म्हणून माझे स्वागत करण्यात आले, जो मी आहे.”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. संघाने यापूर्वीही अशाच मागण्या केल्या होत्या. तेलंगणाच्या हैदराबाद राजधानीचे अधिकृतपणे भाग्यनगर असे नाव देण्याच्या प्रस्तावाबाबतही अनेकदा आवाज उठवला गेला. सरकार नाव बदलण्याच्या प्रक्रियेला उशीर का करत आहे, असा सवाल भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. केंद्रात आणि गुजरातमध्ये भाजपाची सरकारे आहेत.
सुब्रमण्यम स्वामी हे भाजपाचे नेते आहेत, पण पक्षात राहूनही ते विरोधकांप्रमाणेच पक्षावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांवर पक्ष किंवा केंद्र सरकारकडून थेट उत्तर मिळत नसतानाही अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply