लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी पाडायला गेला होता – शिवसेना आमदाराचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई : ३ मे – मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. “मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली,” असं विधान फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केलं.बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. फडणवीस यांच्या याच टीकेचा औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी त्यांचाच एक जुना फोटो ट्विट करत खरपूस समाचार घेतला आहे.
औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांचा काही वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधलाय. “लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी पाडायला गेला होता,” अशा कॅप्शनहीत दानवे यांनी एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे पळताना दिसत आहेत. हा फोटो नेमका कधीचा आहे हे स्पष्ट नसलं तरी फडणवीस यांच्यावर राज्यातील राजकारणामध्ये मोठी जबाबदारी सोपवण्याआधी ते कार्यकर्ता म्हणून आंदोलन करताना एका आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेला फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोत भाजपाच्या काही कार्यकर्त्यांसहीत फडणवीस पळताना दिसत आहेत.
राऊतांचाही टोला
दरम्यान, बाबरी प्रकरणावरुन शिवसेनेला सवाल विचारणाऱ्या फडणवीसांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उत्तर दिलंय. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करत राऊत यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले.
शिवसेना नेते खासदार सतीश प्रधान, मोरेश्वर सावे, विद्याधर गोखले यांच्यासह अनेक नेते व शिवसेना कार्यकर्ते राममंदिर आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेना भवनमध्ये विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता. माझी अयोध्या खटल्यात चार वेळा साक्ष झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह काही शिवसेना नेत्यांवर याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply