अमरावतीतील प्रियांका दिवाण यांची हत्याच – तीनही आरोपी पसार

अमरावती : २९ एप्रिल – शहरातील राधानगरातील श्री साई हेल्थ केअर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये २० एप्रिल रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या प्रियंका दिवाण यांची शांत डोक्याने कट रचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब शवविच्छेदन अहवालावरून समोर आली आहे. प्रियंका यांच्या बहिणीने त्यांची मानसिक व शारीरिक छळ करून हत्या केली. पुरावे नष्ट करून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करण्यात आल्याचा आरोप करत गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती डॉ. पंकज शेषराव दिवाण (४२) यांच्यासह त्यांची आई व बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रियंका यांचे डॉ. पंकज दिवाण यांच्यासोबत २४ ऑगस्ट २०२१ रोजी लग्न झाले. लग्नानंतर तीन महिने प्रियंका यांना चांगली वागणूक मिळाली. मात्र, त्यानंतर डॉ. पंकज दिवाण हे प्रियंका यांना नेहमी चिडचिड करीत होते. लहान-सहान गोष्टींवरून त्यांच्याशी वाद घालत होते. पहिल्या पत्नीला घरी आणतो. तू माझ्या घरातून निघून जा, असे म्हणत होते. डॉ. पंकज दिवाण, त्यांची आई व बहिण हे तिघे प्रियंका यांचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. त्यांनी शांत डोक्याने कट रचून प्रियंका यांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करण्यात आला, असा आरोप मृतक प्रियंका यांच्या बहिणीने तक्रारीत केला आहे.
बुधवार, २० एप्रिल रोजी प्रियंका या मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अकोला येथील रुग्णालयात करण्यात आले होते. शवविच्छेदनाचा अहवाल बुधवार, २७ एप्रिल रोजी पोलिसांना प्राप्त झाला. अहवालामध्ये प्रियंका यांच्या डोक्याला इंटरनल इन्ज्युरी असल्याचे आणि डोक्यात रक्तस्त्राव झाल्याचे नमूद आहे. मरणाचे कारण डोक्यावरील दुखापतीसह श्वास गुदमरल्याने असल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रियंका यांचा खून करून पुरावे नष्ट करण्यात आले. त्यानंतर आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केल्या गेला, असे प्रियंका यांच्या बहिणीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी डॉ. पंकज दिवाण यांच्यासह आई व बहिणीविरुद्ध हत्या, हत्येचा कट रचणे, पुरावे नष्ट करणे, मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मृतक प्रियंका दिवाण यांच्या बहिणीची तक्रार व शवविच्छेदन अहवालावरून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिनही आरोपी पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. व्हिसेरा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. या अहवालानंतर हत्येचे निश्चित कारण स्पष्ट होईल, अशी माहिती गाजनागर पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली आहे.

Leave a Reply