मंदिराच्या यात्रेदरम्यान विजेची तार रथाच्या संपर्कात आल्याने ११ भाविकांचा शॉक लागून मृत्यू

तंजावर : २७ एप्रिल – तामिळनाडूच्या तंजावर येथे एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडलीये. येथील एका मंदिराच्या पारंपरिक यात्रेदरम्यान विजेची तार एका कारच्या संपर्कात आली आणि तब्बल 11 भाविकांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. तर अनेक भाविक या घटनेत जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत
तंजावरच्या कालीमेडू मंदिरात 94 व्या अप्पर गुरुपुजा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पारंपरिक उत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. 9 फूट उंच असलेल्या या रथाची फूलं आणि लाईट्सने सजावट करण्यात आली होती. रथयात्रेतील रथ वळणावर असताना काही कारणास्तव तो तिथे अडकून पडला. याचदरम्यान एक कार विजेच्या तारांच्या संपर्कात आली.
रथ वळवताना वरील विजेच्या तारांमध्ये तो अडकला. त्यामुळे रथाला मागे नेण्याचा प्रयत्न भाविकांनी केला. मात्र, याचवेळी हा रथ हायव्होल्टेज ओव्हरहेड इलेक्ट्रीक लाईनच्या संपर्कात आला आणि यामुळे अनेकांना विजेचा शॉक लागला. अनेक भाविक या दुर्घटनेत बळी पडले. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. या दुर्घटनेच्या फोटोंवरुन त्याची भीषणता दिसून येते. जो रथ या विजेच्या तारांमध्ये अडकला होता तो जळताना फोटोंमध्ये दिसत आहे.
या दुर्घटनेत 11 भाविकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या तंजावर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टालीन यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा केलीये. मुख्यमंत्री स्टालीन हे आज तंजावर येथे जाणार असून परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच, ते जखमींची भेटही घेतील.

Leave a Reply