सेवानिवृत्त प्राचार्य सासऱ्याने सुनेवर ६ महिने केला लैंगिक अत्याचार

अमरावती : २५ एप्रिल – नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सेवानिवृत्त प्राचार्य सासऱ्याने सुनेवर सुमारे सहा ते सात महिने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या मामाने रविवारी पत्रकार परिषदेत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
एका 26 वर्षीय अभियंता युवतीचे पावणेदोन वर्षांपूर्वी अमरावतीमधील रुख्मिणीनगर परिसरातील अभियंता युवकासोबत 24 डिसेंबर 2020 रोजी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांतच सासू व सासरे यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली. तिच्याजवळील दागिने हिसकावण्यात आले. चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्यात येत होती. इतकेच नव्हे तर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून 40 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येत होती.
लॉकडाऊन काळात पीडित विवाहिता वर्क फ्रॉम होममुळे सासरी अमरावतीत होती. या काळात सेवानिवृत्त प्राचार्य असलेल्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर पडली. सासऱ्याने चारित्र्यावर संशय घेऊन तिला घरून हाकलून देण्याची धमकी दिली. पीडितेला महिन्याचे वेतनही आपल्या खात्यात जमा करण्यास भाग पाडण्यात आले. लग्नापूर्वी ‘तुझे प्रेमसंबंध होते, ते मी सर्वांना सांगून माझ्या मुलापासून तुला घटस्फोट देईल’, अशी धमकी देवून पीडितेच्या सेवानिवृत्त प्राचार्य सासऱ्याने तिच्यावर सुमारे सहा ते सात महिने अमरावती, धुळे व पुणे येथे वारंवार लैंगिक अत्याचार केले.
या काळात पीडित विवाहिता सासरच्या मंडळींसोबत माहेरी धुळे येथे गेल्यावर सासऱ्याने तिच्या माहेरी जावूनच 15 जुलै 2021 ला लैंगिक शोषण केले. अमरावतीत आल्यावर सासऱ्याच्या छळात आणखी वाढ झाली. तो संधी मिळेल, तेव्हा सुनेसोबत अश्लील कृत्य करू लागला. पीडित विवाहिता घरी एकटी असताना सासऱ्याने तिचे अनेकदा लैंगिक शोषण केले. याबाबत पीडितेने पती व सासूला माहिती दिल्यावर त्यांनी उलट तिलाच मारहाण केली. त्यामुळे सासऱ्याची हिंमत आणखी वाढली. तो वारंवार सुनेवर अत्याचार करू लागला.
सासऱ्याकडून होणाऱ्या या लैंगिक अत्याचारांमुळे सुनेने सासऱ्याने केलेल्या या अश्लिल कृत्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ तिने आपल्या पतीला दाखवल्यावर पतीने आम्हाला सर्व माहीत असल्याचे सांगून तुला घटस्फोट देईल, अशी धमकी दिली. यामुळे पीडितेने पुणे येथे राहणाऱ्या मामाला घडलेला सर्व प्रकार सांगत हा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर यांनी धुळे जिल्ह्यातील देवपूर ठाण्यात 15 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. नात्याला काळीमा फासणाऱ्या या सासऱ्यासह त्याला साथ देणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी असल्याचेही पीडितेच्या मामाने पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply