आपल्या सर्वांसमोर आज हा देश एकसंध ठेवण्याचं आव्हान – शरद पवार

कोल्हापूर : २४ एप्रिल – कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प सभेतून बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच, आज हा देश एकसंध ठेवण्याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. असंही त्यांनी बोलून दाखवलं.
शरद पवार म्हणाले, “आज हा देश एकसंध ठेवण्याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. २०१४ च्या अगोदर देशाची स्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील सरकार होतं. देशासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणाने कष्ट घेतले गेले आणि अनेक क्षेत्रांमध्ये या देशाची उन्नती कशी होईल, याची खबरदारी घेतली गेली. २०१४ ची निवडणूक ही वेगळी झाली आणि भाजपाच्या हातात सत्ता आली. लोकांचा कौल होता आणि तो आम्ही स्वीकारला. परंतु आपण बघतो आहोत, सत्ता हातात आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसात एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचं दु:ख कमी कसं होईल, समाजातील सगळे घटक एका विचाराने कसे राहतील ही जबाबदारी कोणत्याही राष्ट्रीय नेतृत्वाच्या आणि सरकारच्या प्रमुखांची असते, पण आज चित्र वेगळं दिसतय. माणसा-माणसांमध्ये अंतर निर्माण झालं आहे. आपण बघितलं, मागील काही दिवस देशाची राजधानी दिल्लीच्या काही भागात संघर्ष झाला, हल्ले झाले,जाळपोळ झाली. त्या ठिकाणी कुणाचं राज्य आहे? केजरीवाल यांच्या हातात दिल्लीची सत्ता असेल, पण दिल्लीचं गृहखातं त्यांच्या हातात नाही. दिल्लीचं गृहखातं हे भाजपाच्या हातात आहे, अमित शाह यांच्या हातात आहे आणि गृह खात्याची जबाबादरी ज्यांच्यावर आहे, त्यांनी ही देशाची राजधानी एका विचाराने एकसंध राहील, याची खबरदारी घ्यायला हवी होती, पण ते घेऊ शकले नाहीत.”
तसेच,“मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, दिल्लीत काही घडलं तर त्याचा संदेश जगात जातो आणि जगात या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता आहे आणि तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही? आणि हे केवळ दिल्लीतच नाही तर, दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. मला समजलं की हुबळी सारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आश्चर्य वाटेल अशाप्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले. समजातील जे लहान घटक आहेत, आज कर्नाटकातील समाजातील अल्पसंख्याक लोकांच्याबद्दल त्या ठिकाणी जाहीर बोर्ड लावले, की या गावात या ठिकाणी या अल्पसंख्याकाचं दुकान आहे, त्या दुकानात कुणीही खरेदी करू नये. या ठिकाणी अल्पसंख्याकाचं रेस्टॉरंट आहे तिथे कुणी जाऊ नये. काय समजाव? आणि हा संदेश देणारे लोक सत्ताधारी पक्षाचे आहेत. हे चित्र शेजारच्या राज्याचं आहे. दिल्ली असेल, शेजारचं राज्य असेल, जिथं जिथं भाजपाच्या हातात सत्ता आहे, त्या ठिकाणची हीच अवस्था आहे. त्यामुळे एकप्रकारच्या आव्हानाची अवस्था आज आपल्या सर्वांच्या समोर आहे.” असं शरद पवारांनी यावेली सांगितलं.
कोल्हापूरकरांचे व्यक्त केले आभार –
याचबरोबर “मी कोल्हापूरच्या जनतेला, धन्यवाद देतो की देश अडचणीत नेण्याचा प्रयत्न होत असताना इथे झालेल्य निवडणुकीत इथल्या जनतेने जे काही उमेदवार होते, त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या सगळ्यांनी जो उमेदवार पुढे केला, त्याला मोठ्या मताने आपण विजयी केलं. याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो.” अशा शब्दांमध्ये यावेळी शरद पवार यांनी कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply