मुलानेच केला वडिलांवर चाकूहल्ला

नागपूर : २१ एप्रिल – वडिलांनी दोन लग्न केले. त्यानंतर वडिलांनी दुसऱ्या पत्नीसोबत संसार थाटला. दरम्यान, आईची प्रकृती बिघडल्यामुळे पहिल्या पत्नीच्या मुलांनी तिच्या उपचाराकरिता वडिलांकडे धाव घेतली. आईच्या उपराचाकरिता पैसे मागितले. परंतु, वडिलांनी नकार दिला. यातून राग अनावर झालेल्या मुलांनी थेट वडिलांवरच चाकूने हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून एक देशीकट्टा व जिवंत काडतूस सापडले आहे.
मानकापूर पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, माधवनगर, हनुमान मदिरजवळ भरतवाडा रोड येथे फिर्यादी रमेश बैनी पटेल (वय ४५, वडील) यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. अमित रमेश कुशवाह (वय २१), राहुल रमेश कुशवाह (वय १९, दोन्ही रा. जबलपूर) अशी त्यांची नावे आहेत. ही दोन्ही मुले त्यांच्या आईसोबत वडिलांपासून वेगळी वास्तव्याला आहेत. दरम्यान, त्यांच्या आईची प्रकृती नीट नव्हती. अशा परिस्थितीत तिच्या उपचाराकरिता त्यांच्याकडेही पैसे नसावेत म्हणून दोघेही त्यांच्या वडिलांकडे गेले आणि त्यांना आईची प्रकृती नीट नसून तिच्या उपचाराकरिता पैसे हवेत, असे सांगितले. परंतु, वडिलांनी पैसे देण्यास थेट नकार दिला. यातून त्यांच्यात वाद झा. वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात दोन्ही मुलांनी वडिलांवर थेट चाकूने हल्ला चढवला. मुलांचे चाकुचे वार हाताने वाचविताना वडिलांच्या हातावर चाकुचे घाव लागले. यात ते गंभीर जखमी झाले. पतीवर हल्ला झाल्याचे बघता दुसरी पत्नी ही पतीच्या बचावात धावून आली.
यावेळी आरोपी मुलांनी तिलाही हातबुक्कीने मारहाण केली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलांच्या घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांना आरोपींच्या घरातून एक देशीकट्टा आणि जिवंत काडतूस सापडून आले. या दिशेने देखील पोलिस आता तपास करत आहे.

Leave a Reply