अभिषेक बच्चन, सोनु सूदसह अनेक सेलिब्रिटींचे ‘एसएमए’ग्रस्त विहानसाठी मदतीचे आवाहन

नागपूर : 2१ एप्रिल – ‘एसएमए’ग्रस्त छोट्या विहानसाठी सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन, सोनू सूद यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. अभिषेक बच्चनने विहानसाठी स्वतः आर्थिक मदत केली असून त्याने सोशल मीडियावरील आपल्या फॉलोअर्सना उदार मनाने विहानला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
नेहमीच मदतीसाठी तत्पर असलेला अभिनेता सोनू सूद याच्यासह कुमुद मिश्रा, नागपूरचा फिल्मफेअर पुरस्कार विजेता अभिनेता ऋतुराज वानखेडे, सुमित व्यास, मराठी चित्रपट अभिनेत्री रसिका सुनील, शुभांगी लाटकर, टीव्ही कलाकार गुंजन उत्रेजा या लोकप्रिय अभिनेते, अभिनेत्रींनीदेखील लहानग्या विहानसाठी देणगी देण्याचे आवाहन केले आहे. अभिनेता रणवीर शौरी, मनोज बाजपेयी यांनीही विहानच्या मदतीसाठी रिट्विट केले आहे.
नागपूर स्थित १६ महिन्यांचा मुलगा विहान अकुलवार हा एसएमए (स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी) प्रकार २ या दुर्मिळ अनुवांशिक विकाराने ग्रस्त आहे. या विकारावरील उपचार अत्यंत महाग आहेत. या विकारावर एकमात्र उपचार म्हणजे ‘झोलजेन्स्मा’ नावाचे औषध असून त्याची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. शिवाय, हे औषध रुग्णाला विशिष्ट वयाच्या आत दिले पाहिजे. विहानला या औषधाची तात्काळ आणि नितांत गरज आहे, जेणेकरून त्यावर प्रभावी उपचार होऊ शकतील.
विहानच्या पालकांनी ही रक्कम उभी करण्यासाठी इतर स्रोतांबरोबरच क्राउड फंडिंगचा पर्याय निवडला. परंतु, आता वेळेत त्याच्यावर उपचार होण्यासाठी सर्वांनीच सढळ हस्ते मदत करण्याची गरज आहे. दरम्यान, विहानचे पालक विक्रांत आणि मीनाक्षी अकुलवार यांनी सर्व सेलिब्रिटींचे व ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानले आहे.
“आम्ही आवश्यकतेपक्षा केवळ एक चतुर्थांश रक्कमच उभी करू शकलेलो आहोत. विहानच्या जीवन निरोगी व आनंदी होण्यासाठी शक्य असेल ती करावी, असे आवाहन विहानचे वडील विक्रांत अकुलवार यांनी केले आहे.
एसएमए बद्दल: स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी (SMA) हा एक अनुवांशिक विकार आहे जो हालचालीसाठी वापरल्या जाणार्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा आणि वेस्टिंग या द्वारे दर्शविला जातो. हे विशेष नर्व्ह पेशींच्या नुकसानीमुळे होते, ज्याला मोटर न्यूरॉन्स म्हणतात जे स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करतात. एकदा का एखादी नर्व्ह सेल निकामी झाली की, शरीराच्या त्या भागाला होणारे नुकसान जवळजवळ अपरिवर्तनीय असते. विहानला आधीच पायात कमकुवतपणा, श्वासोच्छ्वास आणि आधाराशिवाय बसता किंवा उभे न राहता येणे अशी लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे, विहानसाठी औषध लवकरात लवकर उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply