गोंदिया : २० एप्रिल – मनसेची भूमिका ही अतिहार्ड असून, ही हार्ड भूमिका घेऊन भाजपाला फायदा होणार नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचे समर्थन घेणे राजकीय पातळीवर भाजपाला महागात पडेल, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भाजप आणि मनसेची युती होऊच शकत नाही. रिपाई पक्ष भाजपसोबत असताना त्यांना मनसेची गरज नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले. बाबासाहेबांना मानणारा हा रिपाई पक्ष सोबत असताना भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
मशिदीवरील भोंगे हटवणे असंवैधानिक असून, राज ठाकरे यांची भाषा गुंडागिरीची असल्याचे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. ते गोंदियात एका कार्यक्रमात बोलत होते. आपला रिपाई पक्ष राज ठाकरे यांना समर्थन करत नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मंदिरात भोंगे लावा, मात्र मशिदीमधील भोंगे हटवणे बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानाने सर्वाना सर्वधर्म समभावचा नारा दिला आहे. जर राज ठाकरे असेच संविधान विरोधी वक्तव्य करत दादागिरी करतील तर रिपाई आपल्या पद्धतीने उत्तर देइल, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी अयोध्याला खुशाल जावे. मात्र, त्यांना आतापर्यंत अयोध्या का आठवली नाही, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. मनसेने ख़ाली हात अयोध्याला जाऊ नये, राम मंदिर बांधण्यासाठी काहीतरी घेऊन जावे, असेही आठवले यावेळी म्हणाले.
दिल्ली येथील हिंसाचारावर रामदास आठवले बोलत होते. हिंसा करणे चुकीचे असून, हिंसा कराल तर जेलमध्ये जाल, असे आठवले यावेळी म्हणाले. हिंसा करणाऱ्यांवर केंद्र सरकारने व राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे.