भंडाऱ्यात कॅनरा बँकेला लागली आग, संपूर्ण साहित्य जळून खाक

भंडारा : ६ मे – भंडारा शहरातील कॅनरा बँकेत पहाटे आग लागल्याने बँकेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. तीन अग्निशामक गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न चालू असले तरीही, इमारतीच्या आत मधून धुळीचे लोट अजूनही निघत आहेत. त्यामुळे इमारतीच्या आत गेल्याशिवाय आग पूर्ण आटोक्यात आली की नाही? हे स्पष्ट होणार नाही.
भंडारा बस स्थानकाजवळ एका इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर कॅनरा बँक आहे. पहाटे साडेपाचच्या दरम्यान या इमारती मधून धूर निघताना नागरिकांना दिसला. याची माहिती पोलीस विभागाला आणि नगर परिषदेला दिल्यानंतर नगरपालिकेच्या दोन अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात वाढली होती. आगीने रौद्ररूप धारण केल्याने जवाहर नगर येथील ऑडनस फॅक्टरीच्या अग्निशामक गाडीला सुद्धा बोलविण्यात आले होते. तसेच नगरपालिकेचे पाण्याचे टँकर सुद्धा या विझवण्याच्या कामात लागले होते. पहाटे पाच वाजता लागलेली आग साडेआठ वाजेपर्यंत विझवण्यात बहुतांश यश मिळाले होते. मात्र तरीही धुळीचे लोट इमारतीच्या आत मधून निघत असल्यामुळे, कोणालाही इमारतीच्या आत जाता न आल्याने आग पूर्णपणे नियंत्रणात आली की नाही हे स्पष्ट होत नव्हते.
बँक असलेल्या इमारतीमध्ये मोबाईल शॉप, इतर बँक, फायनान्स बँक अश्या बऱ्याच यंत्रणा आहेत. पहिल्या मजल्यावर असलेल्या बँकेत जाण्यासाठी एकमेव निमुळता रस्ता आहे. आग लागल्यानंतर अग्निशामक दलातील लोकांना आग विझवण्यासाठी इमारतीच्या खिडक्यांवाटे आत जावे लागले. इतर ठिकाणाहून आग विझवणे शक्य होत नसल्यामुळे दोन ठिकाणाहून इमारतीतील आग विझवण्यासाठी अग्निशामक दलातील लोकांना अथक प्रयत्न करावे लागले.
कॅनरा बँकेत लागलेली ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे कींवा एसीमुळे आग लागली याविषयी अजुनही अस्पष्टता आहे. तसेच फायर आलार्म होता का? या इमारतीचे फायर ऑडिटिंग झाले होते का? हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग पहाटे लागल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Leave a Reply