एकच अपत्य असेल तर अशा कुटुंबाला सरकारने वाढीव शासकीय मदत करावी – नितीन राऊत

नागपूर : १८ एप्रिल – अल्प उत्पन्न गटातील आणि दारिद्र्य रेषेखालील दाम्पत्याला एकच अपत्य असेल तर अशा कुटुंबाला महाविकास आघाडी सरकारने वाढीव शासकीय मदत करावी. शिवाय त्यांच्या शासकीय योजनांच्या लाभामध्ये वाढ करावी, अशी मागणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
नागपुरात “आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी, काँटेंप्रेरी रिलिवेंस” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नितीन राऊत बोलत होते. नितीन राऊत यांनी हे पुस्तक लिहिले असून आज राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते.
देशाची वाढती लोकसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत राज्याच्या आरोग्य विभागाला आणि प्रशासनाला निर्देश द्यावे आणि कुटुंब एका अपत्यापर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या अल्प उत्पन्न असलेल्या किंवा दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वाढीव मदत करावी अशी मागणी नितीन राऊत यांनी केली. एकच आपत्य ठेवणाऱ्या कुटुंबाना विविध शासकीय योजनांच्या वाढीव लाभासह एकरकमी प्रोत्साहनपर बक्षीस द्यावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply