बीड : १८ एप्रिल – राज्यात सध्या भोंग्यांच्या विषयावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातून पुन्हा एकदा ३ मेपर्यंतच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला आहे. त्यानंतर राजकीय पडसाद उमटताना दिसत असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याची दखल घेतली आहे. राजकीय नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया उमटत असताना भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली आहे. त्या बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
“धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. कोणाविषयी बोलण्याचं कारण नाही, पण ज्या गोष्टी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधी ना कधी राजकीय नेत्यांना या विषयाला सामोरे जावं लागणार आहे,” असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी करोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं. “कोविड काळात सरकारने चांगलं काम केलं आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये करोनाचा सामना करत असताना केंद्र सरकार ज्याप्रकारे सजग आणि सतर्क होतं तसंच काळजी घेत होतं त्याप्रमाणे राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले,” असं कौतुक भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलं.