काँग्रेसचे आसाममधील ज्येष्ठ नेते रिपन बोरा यांनी पक्षाचा राजीनामा देत घेतला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : १८ एप्रिल – गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षातील अव्यवस्था किंवा केंद्रीय नेतृत्वावर टीका करत पक्षाला रामराम ठोकला आहे. यामध्ये काही ज्येष्ठ नेतेमंडळींचा देखील समावेश आहे. पंजाब निवडणुकांआधी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडल्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसल्याचा देखील अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा एका ज्येष्ठ नेत्यानं पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे या नेत्यानं सोनिया गांधींना पक्ष सोडत असल्याच्या लिहिलेल्या पत्रामध्ये पक्षाची सध्याची अवस्था आणि आपल्या राजीनाम्याचं कारण याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
काँग्रेसचे आसाममधील ज्येष्ठ नेते रिपन बोरा यांनी रविवारी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच त्यांनी अभिजित बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९७६ पासून अर्थात गेल्या ४५ वर्षांपासून पक्षासोबत राहिलेल्या रिपन बोरा यांनी पक्षातील अव्यवस्थेचं कारण पुढे करत राजीनामा दिला आहे. तसेच, आसाम काँग्रेसमधील लोकांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.
रिपन बोरा यांनी राजीनाम्याच्या पत्रामध्येच राजीनाम्याचं कारण आणि पक्षातील बदल याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे. “भाजपातर्फे सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्या भूमिका मांडल्या जात आहेत. त्यासाठी लढा देण्याऐवजी आणि एकत्रपणे भाजपाला रोखण्याऐवजी या सर्वात जुन्या पक्षातील लोक स्वार्थासाठी एकमेकांसोबतच भांडत आहेत. यामुळे भाजपाला प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेण्याची संधी मिळाली आहे. शिवाय, यामुळे लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांचं देखील मनोधैर्य खच्ची होत आहे”, असं या पत्रात रिपन बोरा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आसाममध्येही हीच परिस्थिती असल्याचं रिपन बोरा म्हणाले आहेत. “मला हे सांगताना फार दु:ख होतंय की भाजपाविरोधात लढण्याऐवजी आसाममध्ये पक्षाच्या सर्वात ज्येष्ट नेत्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली आहे”, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply