हल्ला करून २२ लाखांचे दागिने हिसकावणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : १८ एप्रिल – शहरातील गुन्हेगारीचा ग्राफ वाढीवर आहे. खुलेआम जबरी चोरी, घरफोडी, चोरी आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. याच श्रृंखलेत एका व्यक्तीवर चाकूने वार करीत त्यांच्याकडील २२.३0 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जबरी हिसकावल्याची घटना शनिवारी पुढे आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास यंत्रणा हलवली आणि याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी गुन्हय़ाची कबुली दिली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीवरून, १६ एप्रिल रोजी दुपारी ३.५५ वाजताच्या सुमारास फिर्यादी पूर्वाग केतन कामदार (वय १९, रा. फ्लॅट नंबर ७0८ मंगलम र्शद्धा अपार्टमेंट) यांचे वडील केतन बटुकभाई कामदार (वय ४८) हे त्यांच्या दुचाकीने (वाहन क्रमांक एमएच- ४९ / बी.एफ.- ८८0२) पाचपावली पोलिस ठाणे हद्दीतील कमाल चौक ते गोळीबार चौकाकडे जात होते. दरम्यान, पाचपावली उड्डाणपुलावर ३ अनोळखी आरोपी हे त्यांच्या दुचाकीच्या मागून आले. आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार केले आणि त्यांचे वाहन आणि मोबाईल घेऊन पळाले. या वाहनाच्या डिक्कीत ठेवलेले २२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते. या प्रकरणी फिर्यादी यांनी पाचपावली पोलिसात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३९४, ३९ ७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. घटना आणि घटनेतील मुद्देमाल मोठा असल्यामुळे पोलिसांनी या घटनेवर लक्ष केंद्रित करीत तपास यंत्रणा हलवली. आरोपींचा शोध लागावा याकरिता पोलिसांनी आवश्यक सर्व यंत्रणा तपासली.
रात्रभर शोध मोहीम राबविल्यानंतर रविवारी सकाळी दुपारच्या सुमारास नवीन कामठी पोलिस ठाण्यात कार्यरत चारही बीट मार्शल गस्तीवर असताना त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेजवळील एटीएममधून तीन युवक बाहेर पडताना दिसले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. परिणामी, त्यांनी त्यांना आवाज दिला असता ते पळून जाऊ लागले. स्टेट बँकेच्या मागे असलेल्या मैदानातून ते पळत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि ताब्यात घेतले. या आरोपींना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सराफा व्यापाराला लुटल्याचे कबूल केले. या प्रकरणात आणखी आरोपी समाविष्ट असल्याचा पोलिसांचा संशय असून पोलिसा त्या दिशेनेही अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या घटनेची दखल स्वत: पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही घेतली आहे. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईमुळे आरोपींची नावे कळू शकली नाही. पोलिस प्रशासनाकडून सोमवारी यासदंर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याची शक्यता आहे.

Leave a Reply