ग्रामसेविकेने केला १४ लाखांचा अपहार

यवतमाळ : १० एप्रिल – पुसद तालुक्यातील हुडी(बु.) येथील महिला ग्राम सचिवाने शासनाच्या विविध योजनेतील निधीत सुमारे १४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत पुढे आले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिता दिगंबर आगासे, असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हुडी (बु.) येथील ग्रामपंचायत त्या मागील चार वर्षांपासून कार्यरत आहे. गावासाठी स्वच्छ भारत मिशन, १४ वा वित्त आयोग, बळीराजा चेतना अभियान, दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, पाणीपुरवठा निधी व सामान्य निधी, अशा विविध शासकीय योजनेतून निधी आला. यात आगासे यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीनंतर तत्कालीन गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी पंचायत समिती सदस्य रामेश्वर जाधव, समूह समन्वयक तुळशीराम दत्ता चव्हाण, विस्तार अधिकारी एस.बी. बिलवाल, कनिष्ठ अभियंता संजय तालपेलवार, कनिष्ठ लेखाधिकारी यांची चौकशी समिती गठित केली होती.
चौकशी समितीने अपहाराची सखोल चौकशी केली. त्यानंतर अहवाल सादर केला. अहवालानुसार ग्रामसेविका अनिता आगासे यांनी स्वच्छ भारत मिशनमध्ये दोन लाख चार हजार रुपये, सामान्य निधीत ७५ हजार ३00 रुपये, १४ वा वित्त आयोगमध्ये ६५ हजार २१0 रुपये, बळीराजा चेतना अभियानात ८३ हजार ८१८ रुपये, दलित वस्ती सुधार योजनेत तीन लाख ६0 हजार ७२७ रुपये, तांडा वस्ती सुधार योजनेत १५ हजार ३१३ रुपये आणि पाणीपुरवठा निधीमध्ये ४२ हजार ३00 रुपये, असा एकूण १४ लाख ३४ हजार ३६६ रुपयांचा अपहार केल्याचे सिध्द झाले. चौकशी अहवालानंतर विस्तार अधिकारी व्ही.सी. कोषटवार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिता आगासे यांच्याविरुद्ध शासकीय योजनेत आर्थिक अपहार केल्याबाबत तक्रार नोंदविली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी भादंवि ४२0, ४६८, ४७0, ४७१, नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply