ताजा कलम – ल.त्र्यं.जोशी

मुंबई पोलिसांचे आत्मखंडन

एखादी व्यक्ती किंवा संस्था जेव्हा स्वतःच्या बचावासाठी जो युक्तिवाद करते तेव्हा ती त्या प्रयत्नात स्वतःच्या भूमिकेचे कसे खंडन करते हे आज पवारांच्या मुंबईतील घरासमोर काल झालेल्या राड्याच्या संदर्भात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते.त्यातून गृहमंत्री दिलीप वळसेपाटीलही सुटले नाहीत.
ती घटना घडल्यानंतर काल आपली प्रतिक्रिया देताना स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पोलिस यंत्रणेच्या गलथानपणावर जाहीरपणे ताशेरे ओढले होते.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानीही हल्ल्याचा निषेध करतानाच पोलिस यंत्रणेच्या अपयशावर बोट ठेवले होते.प्रसारमाध्यमांना जी माहिती मिळते ती पोलिस यंत्रणेला कशी मिळू शकत नाही, असा प्रश्न त्या दोघानीही उपस्थित केला होता.एवढेच नाही तर ‘ काल काही लॅप्सेस झाल्या होत्या, त्याचीही चौकशी करू, असे आज स्वतः गृह मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले आहे. असे असताना जेव्हा पोलिस न्यायालयासमोर आपल्याला कथित कारस्थानाची माहिती असल्याचा दावा करतात तेव्हा त्याला आत्मखंडनाशिवाय दुसरे कोणतेही नाव देता येणार नाही.काल एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यांच्या आवारात घुसले असल्याची व सुप्रिया सुळे त्यांची विनवणी करतानाची दृष्ये टी.व्ही.वर सर्व वृत्तवाहिन्यांनी दाखविल्यानंतरही जेव्हा मुंबई पोलिस ती घटना हे एक सुनियोजित कारस्थान असल्याचा दावा करतात.एवढेच नव्हे तर घटनेपुर्वी शरद पवारांच्या बंगल्याची रेकी करण्यात आल्याचा व तेवढेच नाही तर त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा करतात तेव्हा ‘ तुम्ही काय करीत होतात’?असा प्रश्न स्वाभाविकपणेच निर्माण होतो. ती स्वतःच्या गलथानपणाची अधिकृत कबुली ठरू शकते,याचे भानही त्या यंत्रणेला राहू नये,ही आत्मवंचना नाही तर दुसरे काय आहे ?. खरे तर तशी वक्तव्ये करून पोलिस आणि त्यांचे राजकीय मालक स्वतःचा बचाव तर करीत नाहीतच,उलट आपल्या निष्क्रियतेची अधिकृतपणे कबुली देत आहेत असा निष्कर्ष काढायला हवा व त्यानुसार गृह मंत्र्यांचा राजीनामाच घ्यायला हवा.’ सरकारचे ‘ब्ल्यू आईड बाॅय’ म्हणून उच्च न्यायालयाने ज्यांचे वर्णन केले ते मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे वा त्यांचे सहकारी विश्वास नांगरे पाटीलही या जबाबदारीतून मोकळे राहू शकत नाहीत.
वास्तविक गुणरत्न सदावर्ते या आंदोलनात प्रारंभापासूनच आक्रमकपणे बोलत होते.त्यानी आपल्या हल्ल्यातून भाजपानेत्यानाही सोडले नव्हते. पण त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसाना काल पवारांच्या घरावर हल्ला होईपर्यंत कधी सुचले नाही आणि आज स्वतः अडचणीत आल्यानंतर त्याना कथित रेकीचा, कारस्थानाचा साक्षात्कार होतो, याला पश्चातबुध्दी याशिवाय काहीही म्हणता येणार नाही. मविआतील अंतर्गत धुसपूस हा तर आणखी वेगळी अध्याय आहे.तोही हळूहळू बाहेर येईलच.

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर

Leave a Reply