रविवारपासून १८ वर्षावरील सर्वांना सशुल्क बूस्टर डोस

नवी दिल्ली : ९ एप्रिल – रविवारपासून (१० एप्रिल) १८ वर्षांवरील सर्वाना करोनाची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) सशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली. करोनाची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ९ महिने पूर्ण झालेले १८ वर्षांवरील सर्व नागरिक सशुल्क वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. १८ वर्षांवरील सर्वाना खासगी लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा सशुल्क उपलब्ध करण्यात येईल, असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ‘सीरम’निर्मित कोव्हिशिल्डच्या एका वर्धक मात्रेसाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.
वर्धक मात्रेमुळे करोनापासून एक अतिरिक्त संरक्षण मिळेल. दोन्ही मात्रा घेतलेल्या १८ वर्षांवरील पात्र नागरिकांना १० एप्रिलपासून सर्व खासगी लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी केले. आतापर्यंत १५ वर्षांवरील सर्व लोकांपैकी सुमारे ९६ टक्क्यांनी करोना लशीची एक मात्रा घेतली आहे, तर सुमारे ८३ टक्के लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. आरोग्य कर्मचारी, आघाडीवरील कामगार-कर्मचारी आणि ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना दोन कोटी ४० लाख वर्धक मात्रा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, १२ ते १४ वयोगटातील ४५ टक्के लाभार्थीनाही पहिली मात्रा देण्यात आली असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

Leave a Reply