चंद्रपूर : ९ एप्रिल – वेकोलिच्या सास्ती ओपनकाष्ट कोळसा खाणीत शुक्रवार, ८ एप्रिलला दुपारी एक ट्रक पलटी होऊन त्यात पाच कामगार जखमी झाले. यापैकी चार कामगारांना नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
दुपारी दोनच्या दरम्यान ड्रिल विभागाचा ट्रक चार कामगारांना ड्रिल मशिनचे काम करण्यासाठी कोळसा खाणीत घेऊन जात असताना वळणावर ट्रक उलटला आणि चारही चाके वर झाली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने जखमी कामगार नीलेश हटवार, अरुण मांढरे, नूर खान, तिलक संभोज आणि चालक रामदास पेटकर यांना क्षेत्रीय दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, काही कामगारांची स्थिती बघता चालक व्यतिरिक्त इतर चार कामगारांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मात्र, चारही कामगारांची स्थिती गंभीर नाही, असे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.