त्या वाघाची शिकारच! शेतकऱ्यांसह ५ जण संशयित म्हणून ताब्यात

भंडारा : ३ एप्रिल – तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या बावनथडी वितरिकेतील पाण्यात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला होता. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा दावा शवविच्छेदनाअंती वन विभागाने व्यक्त केला होता. परंतु, या वाघाची शिकार करुन त्याला पाण्यात फेकून दिल्याचे आज स्पष्ट झाले. याप्रकरणी वाघाची शिकार करणाऱ्या शेतकऱ्यांसह पाच जणांना वन विभाग आणि पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले आहेत.
गुरुवारी (ता. ३१ मार्च) बावनथडी धरणाच्या वितरीकेत अल्पवयस्क वाघाचा मृतदेह आढळला होता. शुक्र वारी वाघाचे शवविच्छेन चिंचोली येथील शासकीय आगारात करण्यात आले. शवविच्छेदनाअंती स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत गंभीर जखमी झाल्याने तसेच उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला होता. परंतु, वाघाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. जबड्यातील खालील एक सुळा अर्धवट तुटलेल्या होता. तसेच समोरचा उजवा पाय सांध्यामधून निखळलेला आढळला होता. त्यामुळे वाघाचे शवविच्छेदन करणार्या पशु वैद्यकीय अधिकार्यांनी वाघाची शिकारच झाल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, आज शनिवारी भंडारा पोलीस विभागाच्या श्वान पथकाला सकाळीच पाचारण करण्यात आले होते.
तपासाअंती स्थानिक शिकार्यांनी वाघाची शिकार केल्याचे उघड झाले आहे. ज्या ठिकाणी वाघाला मारण्यात आले त्या ठिकाणच्या शेती करणार्या शेतकर्याने वाघाला ठार मारल्याचे उघड झाले. वाघाला ठार मारल्यानंतर बैलबंडीच्या सहाय्याने त्याला बावनथडीच्या वितरीकेजवळ नेण्यात आले. आज बैलगाडीची पाहणी केली असता बैलगाडीवर रक्ताचे डाग आढळून आले. वन विभागाने शिकारीचे साहित्य, बैलगाडी व अन्य जनावरांचे हाड त्याच्या घरातून जप्त केले. याप्रकरणी पाच जणांना संशयाच्या आधारावर ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी चौकशी सुरू असून सध्या शिकाऱ्यांचे नाव उघड करण्यात आले नाही.

Leave a Reply