कर्नाटकमध्ये हिजाबबंदीनंतर आता हलाल मांसविक्रीवर बंदी आणण्याची मागणी

बंगळूरु : २ एप्रिल – कर्नाटकमधील शिक्षणसंस्थांत हिजाबबंदी आणि त्यानंतर मंदिरांच्या परिसरात मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी करण्याच्या वादानंतर आता राज्यात हलाल मांसावर बंदी आणण्याची मागणी पुढे आली आहे. हलाल मांसावर बहिष्काराचे आवाहन केले जात असून याप्रकरणी हिंसाचार घडविल्याबद्ल शिवमोगा येथे बजरंग दलाच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवमोगा आणि बंगळूरुप्रमाणेच राज्यातील अन्य भागांतही हिंदूत्ववादी कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना आवाहन करीत आहेत की, त्यांनी किराणा सामान आणि मांसाची केवळ हिंदू विक्रेत्यांकडून खरेदी करावी. हलाल मांस उत्पादनांवर बंदीची मागणी करीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथे एका हॉटेलमध्ये घुसून तेथील कामगारांवर हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हलाल मांसाचे पदार्थ विकल्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करण्यात आली. त्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका ग्राहकावर हल्ला करण्यात आला, अशी माहिती शुक्रवारी पोलीस अधीक्षक बी.एम. लक्ष्मीप्रसाद यांनी दिली. याप्रकरणी बजरंद दलाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवारी हिंदूत्ववादी नेते प्रशांत संबार्जी आणि पुनीत करेहल्ली यांनी बंगळूरुच्या चामराजपेठ भागात हलालबंदीसाठी पत्रके वाटली. स्थानिकांनी त्यांना अडवून परत पाठविले, तसेच यावरून धार्मीक भेद निर्माण करू नका, असेही सुनावले.

Leave a Reply