सत्तेसाठी ईडीला चिल्लर बनवण्याचं काम भाजपने केले – नाना पटोले

नागपूर : १ एप्रिल – जाहीर कार्यक्रमात तलवार दाखवल्याप्रकरणी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणावरून काँग्रेस नेते हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून काँग्रेसला डिवचत आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी नाना पटोले यांनी विचारला. यावर बोलताना पटोले म्हणाले की, ‘त्या पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांना विचारून ती कारवाई केलेली नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी याबाबत माहिती घेतो, असं सांगितलं आहे. त्यामुळे मतभेदांचा प्रश्नच नाही,’ असं म्हणत पटोले यांनी महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
वकील सतीश उके यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं. ‘कोणतीही कारवाई होते त्यामागे तपास यंत्रणांचा अधिकार असतो, मात्र आता ज्या प्रकरणाचा काही संबंध नाही अशा प्रकरणातही ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. सत्तेसाठी ईडीला चिल्लर बनवण्याचं काम भाजपने केलं. तसंच दहशत निर्माण करून ब्लॅकमेलिंग करण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. अशा कारवायांमुळे कायद्याचं राज्य आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस पक्ष विकासाचं राजकारण करतो, पण काही लोक देश विकून देश चालवत आहेत, अशा शब्दांत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Leave a Reply