शहरात पुन्हा धावत्या बसने घेतला पेट, ४५ प्रवासी थोडक्यात बचावले

नागपूर : १ एप्रिल – नागपूर महापालिकेच्या आपली बसच्या तफ्यातील स्टार बस ही पाचगाव ते बर्डी आशा मार्गावर पटवर्धन डेपोतून निघाली. प्रवाशांना घेऊन मेडिकल चौकात पोहोचताच बसला ९.४५ वाजताच्या सुमारास आग लागली. लगेच आग बसमध्ये पसरली. यावेळी बस ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत लगेच प्रवाशांना बसच्या बाहेर सुखरूप काढले. बसमध्ये ४५ प्रवासी होते. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
पाचगाव ते बर्डी या मार्गावर महापालिकेची बस प्रवासी सेवा आहे. नेहमीप्रमाणे स्टार बस (क्रमांक एमएच ३१ एफसी 0४१३) ही बस घेऊन ड्रायव्हर दिवाकर गणपतराव काकडे (वय ४0) ही बस घेऊन निघाले. प्रवासी स्थानकावर थांबत ते मेडिकल चौकातून क्रीडा चौकाच्या मार्गावर निघाले. यावेळी रुपम इलेक्ट्रॉनिक्स पुढे अचानक चालत्या बसमध्ये बसच्या समोरील बोनेटमधून धूर निघू लागला. धूर बघताच ड्रायव्हरने बस थांबविली. अशातच बसने पेट घेतला. बसला अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी बस ड्रायव्हर यांनी स्वत:च्या जीवापेक्षा प्रवाशांची अधिक चिंता केली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत लगेचच प्रवाशांना बसमधून तत्काळ बाहेर काढले. सर्व प्रवासी हे सुखरूप बाहेर पडले. रस्त्यावर धगधगती बस बघून या परिसरात एकच गर्दी जमली. येणारे-जाणारे थांबले होते. अनेकांनी या ‘बर्निंग बसचे’ मोबाईलवर व्हिडीओ तयार केले. दरम्यान, एका नागरिकाने लगेच अग्निशमन विभागाला यासंदर्भात माहिती दिली. घटनेची गंभीरता बघता कॉटन मार्केट आणि सक्करदरा येथून काहीच वेळेत दोन अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना झाले. तिकडे अजनी पोलिस ठाण्याचा स्टाफदेखील परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता पोहचता झाला होता. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याची कारवाई करत पावणे दोन तासात ही आग आटोक्यात आणली. आगीत बसचे पुढील दोन चाक, इंजिन, पुढील बॉडी, आतमधील सिट्स पूर्णता जळून खाक झाल्या. या घटनेत बसचे एकूण २ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन विभागाकडून वर्तविण्यात आला. शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात उष्णतेची लाट आहे. पुढील आणखी चार दिवस ही लाट अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वाढत्या उन्हामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नागपूर शहराचा पारा देखील ४२ अंशावर पोहचला असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply