असेच सुरु राहिले तर देशात एकता राहणार नाही – काश्मीर फाईल्स वरून शरद पवारांची टीका

नवी दिल्ली : ३० मार्च – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर भाष्य केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. या चित्रपटामुळे देशातील एक विचार मारला जात असल्याचं तसंच बंधुप्रेम संपवलं जात असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. “या चित्रपटामुळे एक विचार मारला जात आहे. त्यात गांधीजी, नेहरू यांचा काय संबंध? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
दिल्लीमध्ये आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला शरद पवारांनी उपस्थिती लावली. या मेळावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. महत्वाचं म्हणजे या मेळाव्यात यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
“त्यावेळी जे काही झालं तेव्हा व्ही. पी. सिंग सत्तेत होते. भाजपाचा त्यांना पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री, राज्यपाल कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा मुद्दा तयार केला जातो, त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झालं ते देशासाठी चांगलं झालं नाही. त्या लोकांना तिथून इकडे यावं लागलं ही चांगली गोष्ट नव्हती. पण जे झालं ते विसरून समाजात एकता कशी राहील हे पाहिलं पाहिजे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
“दु:ख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरु होतं तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असंच सुरु राहिलं तर देशात एकता राहणार नाही,” अशी भीती शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.
“इतकंच नाही तर, देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपाचा विश्वास नाही. त्यात पाठिंबा भाजपाला मिळाला आणि सत्ता त्यांच्याकडे आली. एक चित्रपट येतो, त्यात काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले आणि ते हल्ले काँग्रेस आणि अल्पसंख्यांकांनी केले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदूंवर अत्याचार झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असंही शरद पवार म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठवलेल्या पत्रासंबंधी बोलताना शऱद पवारांनी सांगितलं की, “भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये सत्तेचा गैरवापर होत आहे. त्यामुळे एकत्र बसून चर्चा करत रणनीती ठरवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही संसदेत बोलणार आहोत आणि त्यानंतर काय ते ठरवू”.

Leave a Reply