घरून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

नागपूर : २९ मार्च – वडगाव बेला येथील प्रेमीयुगुलाने चार दिवसांपूर्वी घरून पळ काढला होता. त्यांचा शोधाशोध सुरू असतानाच समुद्रपूर तालुक्यातील उमरी गावाजवळील विहिरीत दोघांनी हातात हात घालून उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, मुलगा महेश शालिक ठाकरे (वय २८, रा. बेला) व पंधरा वर्षीय मुलगी (रा. वडगाव बेला) या प्रेमीयुगुलाने शुक्रवार, २५ मार्च राजी दुपारी दोन ते तीन वाजतादरम्यान घरून पळ काढला होता. घराबाहेर जाऊन तीन-चार दिवस बाहेर काढत सोमवारी दुपारी समुद्रपूर तालुक्यातील उमरी गावाजवळ एका शेतातील विहिरीत दोघांनी हातात हात घालून उडी मारून जीवनयात्रा संपविली. बेला येथील शाळेत नवव्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी महेशच्या प्रेमात पडली. दोघांनी जीवनाची सुरुवात करायची म्हणून आणाभाका घेत दोघेही घराबाहेर पडले.
सायंकाळी आई-वडील घरी आले तेव्हा बघितले तर मुलगी घरी नव्हती. आजूबाजूला विचारणा केली. परंतु, कुणीच काही सांगितले नाही. शेवटी आईने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
बेला पोलिसांनी तक्रार नोंदवत प्रकरण तपासामध्ये ठेवले. अशातच सोमवारी दुपारी एक वाजतादरम्यान मुलीच्या नातेवाईकांना माहिती मिळाली की, दोघेही प्रेमीयुगल उमरी येथील एका शेतात आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहेत. तेव्हा मुलाचे जावई दुचाकीने घटनास्थळी गेले असता त्यांच्या डोळ्यादेखत दोघांनी जवळ असलेल्या विहिरीत हातात हात घालून उडी मारली. शेतात कोणी नसल्याने आरडाओरड केली. परंतु, कोणीही मदतीला धावून आले नाही. त्या विहिरीत गाळ असल्यामुळे हे दोन्ही प्रेमीयुगुल गाळात फसल्यामुळे ते वर काही येऊ शकले नाही. घटनेची माहिती बेला पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. सदर प्रकरण समुद्रपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या उमरी गावाच्या बिट जमादारकडे सोपविले. अथक प्रयत्नानंतर त्या दोघांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. उत्तरीय तपासणीकरिता वर्धा येथील शासकीय रुग्णालयात दोघांचे मृतदेह पाठविण्यात आले. पुढील तपास समुद्रपूर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी काळे करीत आहेत.

Leave a Reply