घ्या समजून राजे हो…- विधानसभा बरखास्त करून स्वबळावर निवडणूक लढवण्याची मर्दुमकी मर्द उद्धव ठाकरेंनी दाखवावी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी काल विधानसभेत बोलताना ‘मर्द असाल तर मर्दासारखे अंगावर या मग बघून घेतो’ असे थेट आव्हान महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना दिले आहे. ‘तुम्हाला सत्ताच हवी आहे तर मला तुरुंगात टाका मात्र ज्यांनी मुंबई वाचवली त्या माझ्या शिवसैनिकांना विनाकारण छळू नका अशीही विनंती त्यांनी यावेळी केली आहे.
काल उद्धवपंतांनी विरोधकांवर घेता येईल इतके तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला असला तरी ज्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते त्यात विरोधकांनी केलेल्या कोणत्याही आरोपांवर नेमके उत्तर दिले नाही. त्यामुळेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे भाषण विधानसभेतील वाटत नाही तर शिवाजी पार्कवर केलेले भाषण वाटते असा टोलाही लगावला आहे. काल विधीमंडळात मुख्यमंत्री आणि विरोधक यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकींचा मागोवा घेण्याचाच प्रयत्न आजच्या लेखात करण्याचा हा प्रयत्न आहे.
‘मर्द असाल तर मर्दासारखे अंगावर या’ ईडी नामक शिखंडीला पुढे करुन आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नका अशा शब्दात काल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मात्र समोरच्याला मर्दासारखे लढा आणि सत्ता मिळवा असे आव्हान देणार्‍या मुख्यमंत्र्यांनी स्वतः काय केले याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक केली आहे. मर्दपणे लढून स्वबळावर एकदा तरी त्यांनी महाराष्ट्रात सत्ता मिळविली आहे काय किंवा ते सत्ता मिळवू शकतात का? हा प्रश्‍न उद्धवपंतांनी आधी स्वतःला विचारायला हवा. शिवसेनेचा इतिहास बघितल्यास भाजपशी युती करण्याआधी 1980-1985 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांचा एकही आमदार नव्हता. 1990 पासून भाजपसोबत निवडणूका लढायला सुरुवात केली त्यानंतरच त्यांचे आमदार वाढले. तरीही कधीही त्यांनी आमदार संख्या तीन आकड्यांपर्यंत गाठली नाही. 1990 ते 2009 च्या निवडणूकांचा आढावा घेतल्यास 1990 आणि 1995 या दोन वर्षात शिवसेनेचे आमदार वाढते होते. 1999 पासून हा आकडा सतत घटणारा होता. तरीही आम्ही महाराष्ट्रात मोठे भाऊ म्हणून शिवसेनाच जास्त जागा लढत होती. 2009 मध्ये तर जास्त जागा लढूनही शिवसेनेचे भाजपपेक्षाही कमी आमदार होते. त्यामुळे विरोधीपक्ष नेतेपद यांना नाईलाजाने भाजपला द्यावे लागले होते. 2014 मध्ये स्वबळावर महाराष्ट्रातील सर्व जागा लढविण्याची हिंमत शिवसेनेने दाखवली खरी मात्र 288 पैकी फक्त 62 जागी त्यांचे उमेदवार निवडून आले. याचवेळी स्वबळावर लढणार्‍या भाजपाने मात्र 122 उमेदवार निवडून आणले होते. तरीही भाजपने शिवसेनेला सोबत घेतले आणि पाच वर्ष सरकार चालवले. 2019 मध्येही भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूका लढवल्या. या निवडणूकीतही शिवसेनेचे जेमतेम 56 आमदार निवडून आले. तरीही रेडीचा डाव खेळत शिवसेनेने आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्या असे म्हणत भाजपशी युती तोडली असे करण्यात कोणती मर्दुमकी होती. याचे उत्तर उद्धवपंतांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवे. शेवटी मुख्यमंत्री पदासाठी लाचार होत त्यांनी शरद पवारांचे आणि सोनिया गांधींचे पाय धरले. आजही ते खरे मर्द असतील तर त्यांनी विधानसभा भंग करावी आणि राज्यातील सर्वच्यासर्व 288 जागांवर आपले शिवसैनिक उभे करावे. या पद्धतीने त्यांनी निवडणूक जिंकून स्वतःला बाजूला ठेवत एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले तर महाराष्ट्रातील जनता उद्धवपंतांना मर्द माणूस म्हणून डोक्यावर घेऊन नाचेल. मात्र स्वतः मर्दपणा न दाखवता दुसर्‍यांना तुम्ही मर्दुमकी दाखवा असे आवाहन करण्यात काय हशील आहे हे उद्धवपंतांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगायला हवे.
केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून देशातील केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्ष माझ्या शिवसैनिकांना छळत आहे असा आरोप उद्धवपंतांनी आपल्या भाषणात काल केला आहे. महाराष्ट्रात केंद्र सरकारची तपास यंत्रणा असलेल्या सीबीआय, ईडी आणि तत्सम संघटनांनी सध्या महाआघाडी सरकारमध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या नेत्यांवर धाडी टाकून त्यांना अडचणीत आणणे सुरु केले हे वास्तव आहे. मात्र या तपासयंत्रणा कोणावरही धाडी का टाकतील याचेही उत्तर उद्धवपंतांनी आरोप करण्यापूर्वी शोधायला हवे. या तपासयंत्रणा धाडी तेव्हाच टाकतात जेव्हा त्यांच्याकडे तक्रारी येतात. तक्रारी आल्यावर त्यात किती तथ्यशं आहे हे तपासूनच धाडी टाकल्या जातात. त्या धाडींमध्ये काही अवैध अथवा गैर आढळले तरच संबंधितांवर या तपास यंत्रणांना कारवाई करता येते. प्रताप सरनाईक किंवा श्रीधर पाटणकरांच्या कोट्यावधीच्या मालमत्ता जप्त करताना ईडीने काहीतरी तथ्यशं शोधला असणारच. जर यात तथ्यशं नसेल तर संबंधित व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते. न्यायालयात दाद मागितल्यावर जर त्यात तथ्यशं आढळला नाही तर न्यायालय कारवाई अवैध ठरविते. जर काही तथ्यशं आढळला तर न्यायालय कारवाई परवानगी देते. महाराष्ट्राच्या पोलिसांनी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना अटक केली खरी पण काही तासातच न्यायालयाने त्यांना मुक्त केले. कारण महाराष्ट्राच्या पोलिस कारवाईत काहीही दम नव्हता. त्याचवेळी राज्य मंत्रीमंडळात मंत्री असलेल्या नबाब मलिकांना ईडीने आधी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि मग अटक केली. इथे नबाब मलिकांच्या वकिलांनी जीवाचे रान करुनही त्यांना अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. तपास यंत्रणा तथ्यशं असल्याशिवाय कारवाई करु शकत नाहीत. हे बघता आतापर्यंत तुम्ही गैरप्रकार करत आलात. आतापर्यंत कोणी तक्रारी केल्या नाहीत, म्हणून तुम्ही वाचलात. मात्र आता तक्रारी झाल्यावर तुम्हाला पकडले तर त्यात गैर काय? कोणताही चोर चोरी करताना पकडल्या गेल्यावर माझा गुन्हा नसतानाही मला पकडले असा कांगावा करत असतो. तसाच हा उद्धवपंतांचा प्रकार आहे.
तपास यंत्रणांचा वापर करुन कुटुंबियांना छळले जात असल्याचा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला आहे. आज तुमच्या कुटुंबियांवर आच आली म्हणून तुम्हाला दुःख होते आहे. सहाजिकच आहे. ‘ज्याचे जळते त्याला कळते’ अशी एक म्हण आहे. मात्र अगदी काल परवापर्यंत तुमचा शेंबडा शिवसैनिकही माजी मुख्यमंत्री आणि आजचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर येऊन टिका करत होता आणि तुमची समर्थक माध्यमेही त्यांना टार्गेट करत होती. तेव्हा तुम्ही इतरांचे सोडा पण तुमच्या शिवसैनिकांना तरी आवरले होते का? जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात हे उद्धवपंत पार विसरले आहेत.
ज्याप्रमाणे रावणाचा जीव बेंबीत होता त्याप्रमाणे विरोधकांचा जीव मुंबईत अडकला आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले आहे. मुंबईत जीव कोणाचा अडकला आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. शिवसेनेची स्थापना झाली ती मुंबईतील मराठी माणसाचे हित जपण्यासाठी. नंतरच्या काळात शिवसेनेने आपले आर्थिक साम्राज्य कसे उभे केले याचा शोध घ्यायचा झाल्यास मुंबईतील तत्कालिन व्यावसायिकांना विचारावे लागेल. मुंबई महापालिका ताब्यात आल्यावर शिवसेना खर्‍या अर्थाने बाळसली. त्यामागे कोणते अर्थकारण होते हे स्पष्ट आहे. आजही मुंबई महापालिका ताब्यात आहे म्हणून शिवसेना जिवंत आहे असे बोलले जाते. ज्या क्षणी मुंबई महापालिकेतून शिवसेनेची सत्ता जाईल त्या क्षणी शिवसेनेचे चांगले दिवस संपतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही. इतके वर्ष शिवसेनेने महापालिकेत सत्ता राखूनही मुंबईतील समस्यांमध्ये काहीही सुधारणा नाही हे स्पष्ट दिसते आहे. शिवसैनिक खरे मर्द असतील तर आतापर्यंत आम्ही महापालिका सांभाळली. आता दुसर्‍या पक्षाने समोर यावे असे सांगून सत्ता सोडण्याची हिंमत दाखवावी मग कोणाचा जीव कुठे अडकला हे दिसून येईल.
गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरफटत भारतात आणण्याची घोषणा केली होती. ओबामांनी घरात घुसून जसे लादेनला मारले तसे दाऊदला घरात घुसून मारण्याची हिंमत दाखवा असेही ठाकरे यांनी विरोधकांना ललकारले आहे. मुंडे यांनी ही घोषणा केली त्यावेळी तुमच्याच सोबत ते युतीत होते. त्यावेळी दाऊदला फरफटत आणण्यासाठी तुम्ही किती ताकद त्यांना दिली याचेही उत्तर तुम्ही द्यायला हवे. त्याचबरोबर ज्या निवडणूक प्रचारात मुंडेंनी दाऊदला फरफटत आणण्याची घोषणा केली होती त्याच निवडणूक प्रचारात बाळासाहेब ठाकरेंनी एन्रॉन अरबी समुद्रात नेऊन बुडवण्याची घोषणा केली होती. नंतर एन्रॉनच्या रिबेका मार्क मातोश्रीवर जाऊन भेटल्या आणि चित्र बदलले. नंतर एन्रॉनचे काय झाले हे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर उभा देश जाणतो.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी नबाब मलिक यांची पाठराखण केली आहे. नबाब मलिक यांनी दाऊदच्या मार्फत मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप विरोधक करत आहे. मात्र ते दाऊदचे हस्तक आहेत याचा शोध केंद्रीय तपास यंत्रणांनी का केला नाही असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. मात्र ज्यावेळी ईडीने ते पुरावे समोर आणले त्यावेळी तरी ठटाकरेंनी मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा का मागितला नाही हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो.
असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर उद्धवपंतांनी खुलासा करणे गरजेचे आहे. अर्थात ते तसा काहीही खुलासा करणार नाही हे स्पष्ट आहे. काल त्यांच्या भाषणानंतर राईट टू रिप्लॉय अंतर्गत बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्ही मोदींच्या नावाने मते घेतली आणि सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागलात असा सवाल करीत मुख्यमंत्र्यांच्या आरोपांची परतफेड केली आहे. कौवरांनी ज्याप्रमाणे कपटाने राज्य जिंकले होते. त्याचप्रमाणे तुम्ही कपटााने राज्य मिळवलेआहे असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला आहे.
यासर्व प्रकारात उद्धवपंतांनांनी एकच गोष्ट समजून घ्यावी असे सुचवायचे आहे. तुम्ही राजकारणासाठी आणि सत्तेसाठी खरेखोटे हवे ते विधानसभेत बोलाल आणि त्या क्षणी बाजी मारूनही जाल. मात्र तुम्ही काय बोलता ते महाराष्ट्रातील 12 कोटी जनता ऐकते आणि वाचतेही. सर्वच जनता काही आता दूध खुळी किंवा बोळ्याने दूध पिणारी राहलेली नाही. तुम्ही काय बोलता आणि कसे वागता हे जनता बघते आहे. त्यामुळे जनतेत जाऊन तुम्हाला तुमची बाजू मांडावी लागेल.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता उद्धवपंत खरे मर्द असतील तर त्यांनी महाराष्ट्रात स्वबळावर लढावे आणि महाराष्ट्राची सत्ता मिळवून दाखवावी तसे केले आणि मग केंद्राने तुमच्यावर कितीही तपासयंत्रणा सोडल्या तरी महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत राहील. मर्द नेता म्हणून महाराष्ट्रातील जनतेने ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंना डोक्यावर घेतले होते. त्याचप्रमाणे तुम्हालाही इथली जनता डोक्यावर घेईल. त्यासाठी तुम्ही एकदा विधानसभा बरखास्त करुन नव्याने स्वबळावर निवडणूक लढवण्याची मर्दुंमकी दाखवण्याची गरज आहे. ही मर्दुमकी तुम्ही दाखवावी अशी महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने आपल्याला विनंती आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply