महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा – सामनाच्या मुखपत्रातून विरोधकांवर टीका

मुंबई : २१ मार्च – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभरामध्ये तिथीप्रमाणे साजरी केली जात आहे. दरवर्षी शिवसेना तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. यंदाच्या शिवजयंतीनिमित्त शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखामधून भाजपावर निशाणा साधलाय. केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारबरोबरच राज्यामधील नेत्यांवरही शिवसेनेनं अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. राज्य कारभाराला उत्सव समजणे, बेरोजगारी, मराठीचा वापर अशा अनेक मुद्द्यांवरुन शिवसेनेनं भाष्य केलंय.
“आज शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन अनेक कवींनी, शाहिरांनी, इतिहासकारांनी आपापल्या वकुबानुसार केले आहे. नेवाशाला राहणारा परमानंद कवी हा महाराजांचा विश्वासू होता. त्याने आपल्या ‘शिवभारत’ ग्रंथात ‘चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम्’ असे म्हटले आहे. बखरकाराप्रमाणे शंकराचा अवतार न मानता तो शिवाजीराजांना विष्णूचा अवतार म्हणतो. परमेश्वर जसा सर्वांच्या वर दहा अंगुळे उरला असे सांगतात तशीच गोष्ट शिवाजी महाराजांची आहे. त्यांची कितीही चरित्रे लिहिली तरी ‘शिवाजी महाराज’ त्या सर्व चरित्रांवर दहा बोटे शिल्लक आहेतच. महाराष्ट्राला इतिहास आहे तसा इतर प्रांतांना नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे, कारण येथे शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांनी औरंगजेबाच्या मस्तकावर पाय देऊन स्वराज्य स्थापन केले. ‘‘औरंगशहाला स्वतःलाच दिल्लीत कोंडीन’’ असे शिवाजी महाराजांचे वक्तव्य इंग्रजी इतिहासात सापडते,” असं अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.
“महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही. दिल्लीची गुलामी पत्करत नाही या विचारांची बीजे, ‘‘औरंगशहाला दिल्लीतच कोंडीन’’ या शिवरायांच्या मर्दानी बाण्यात आहेत. महाराज हे शिवप्रभू होते. सभासदी बखरीत काय वर्णन केले आहे ते पहा. कृष्णाजी अनंत सभासद यांनी रचलेली, शिवाजी महाराजांच्या देहत्यागानंतर तयार झालेली ही बखर. सभासद आपल्या बखरीत ‘राजियांचे चरित्र आख्यान’ यामध्ये ते म्हणतात, ‘‘राजा साक्षात केवळ अवतारीच. जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदापासून रामेश्वरापर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही व मोगलाई या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पातशहा असे जेरजप्त करून नवेच राज्य साधून मराठा पातशहा सिंहासनाधीश छत्रपती जाहला. प्रतिइच्छा मरण पावून कैलासाला गेला. ये जातीचा कोणी मागे जाहला नाही, पुढे होणार नाही,’’ असा संदर्भ लेखात देण्यात आलाय.
पुढे अप्रत्यक्षपणे शिवसेनेनं विरोधकांवर टीका केलीय. “शिवाजी महाराजांचे नाव सध्याचे राजकारणी ऊठसूट घेतात. पंतप्रधान मोदी तर दिल्लीपासून काशीपर्यंत कोठेही गेले तरी शिवरायांच्या नावाचा घोष करतात, पण शिवरायांच्या विचाराने आज राज्य चालले आहे काय? शिवकालीन राजनीती हा एक चिंतनाचा विषय आहे. शिवाजी महाराजांनी जे ‘स्वराज्य’ स्थापन केले तिच्या बुडाशी काही थोर तत्त्वे होती. शिवचरित्राचे खरे सार काढले तर त्यातून दोन प्रमुख सूत्रे बाहेर पडतात. एक म्हणजे परचक्राचा हरतऱ्हेने विरोध करून स्वराज्य स्थापायचे आणि दुसरे, स्वराज्याचा पाया मुख्यतः कष्टकरी जनतेवर आधारून राज्य चालवायचे व स्वराज्याला आकार द्यायचा,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
“शिवकालीन परचक्र म्हणजे मोगलांचे आक्रमण, दक्षिणेतील बादशाह्यांचे हल्ले. शिवाजी महाराजांनी ते सर्व उलथवून पाडले. हिंदुस्थानातल्या वतनदार, जहागीरदारांनी परचक्राला साथ दिली, जनतेचा छळ केला. म्हणून शिवाजीराजांनी मराठी राज्य स्थापन करताच वतनदाऱ्या व जहागिऱ्याच रद्द केल्या आणि सैन्यानेसुद्धा गावांमधून काही वस्तू घेतल्यास तिची किंमत दिली पाहिजे असा हुकूम केला. पिकावरचा सारा मक्ता देऊन वसूल करण्याची पद्धत बंद केली. सैरावैरा फिरणारे, भटके कातकरी, बेरड जमातींना किल्ल्यावर पहारेकऱ्यांच्या नेमणुका करून दिल्या व त्यांना कसायला शेत देऊन त्यांच्या वसाहती केल्या. त्यामुळे त्यांना प्रामाणिकपणाने आयुष्य जगण्याची संधी व साधने मिळाली. बेकारी नष्ट झाली,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
“शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला, मंत्रिमंडळ स्थापन केले, ते नुसते ‘राज्य’ भोगीत बसले नाहीत, तर ताबडतोब मराठी राजभाषा कोश तयार करून परकीय भाषेची महाराष्ट्रातून हकालपट्टी केली. फारशी भाषेवाचून माझे कोर्ट-कायदा, दरबार, कारभार चालणार नाही अशी अडचण त्यांना भासली नाही. मराठी भाषा व संस्कृतीच्या विकासावर त्यांनी भर दिला. शिवाजी महाराजांचे राजकारण म्हणजे फक्त ‘उत्सव’ नव्हते. त्यांनी कणाकणांत स्वाभिमान निर्माण केला. तो आजही कायम आहे. म्हणूनच महाराष्ट्राला वाकवणे व झुकवणे दिल्लीश्वर व त्यांच्या चमच्यांना कधीच जमले नाही. महाराष्ट्र सदैव लढतच राहिला,” असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.
“शिवरायांचे राज्य श्रमिकांचे होते. त्याच श्रमिकांनी लढून मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. तोच श्रमिक बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट पाठीराखा बनला. महाराष्ट्र कधीच रडत बसला नाही. हीच शिवरायांची प्रेरणा. संभाजीराजांना दगलबाजीने मारल्यावर सेनापती मेला म्हणून महाराष्ट्र रडत बसला नाही. उलट सूडाने आणखी पेटून उठला, खवळून उठला. प्रत्येक शेतकरी, मराठा, मावळा लढत राहिला व संभाजी राजांना मारणाऱ्या औरंगजेबाला याच महाराष्ट्रात गाडून शांत झाला. मुजरे आणि हुजरे करणाऱ्यांत महाराष्ट्राची गणना झाली नाही, हेच खरे शिवचरित्र. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य दिले, ते शौर्य आजही भवानी तलवारीसारखे धारदार व खणखणीत आहे. आजच्या शिवजयंतीस आम्ही महाराष्ट्राच्या दुश्मनांना त्याची जाणीव करून देत आहोत. महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा आहे!”

Leave a Reply