बकुळीची फुलं : भाग २२ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

वनिता विकास विद्यालयात नोकरी करण्यापूर्वी मी उन्हाळ्याच्या सुट्टीत टेलरींगचा क्लास केला होता. काहीतरी धडपड हा माझा स्वभाव असल्याने पेपर , आकाशवाणी ह्यावर कविता , श्रृतिका आणि आता कथाही लिहू लागले होते .
सर्वत्र अनुभव चांगलाच येत असल्याने मनात एक अहंकार तयार झाला होता. सारा समाज चांगला आहे . ही एक धारणा झाली होती तशीच मी करते ते चांगलंच हेही मनाला पटलं होतं.
तसंच मी सर्वांवर बेधडक विश्वास ठेवत होते . आणि अजून पर्यंत तरी विश्वास कायम होता माणसांवर.
टेलरींग क्लासमध्ये असतांनाच दक्षिणेत महापूर स्थिती आली होती . लोक बेघर झाले होते . रहायला जागा नाही , अंथरायला काही नाही , घालायला कपडे नाहीत , हे सारं पेपरमधे वाचत असतांनाच मला ती महापूराने होणारी लोकांची दशा सतत डोळ्यासमोर दिसत होती . आणि योगायोगाने मला एक गृहस्थ भेटले ते म्हणाले .
“आम्ही पूरग्रस्तांना मदत करणार आहोत . कोणी असेल त्यांना सांगावं” आणि मला मार्ग मिळाला .
आणि आम्ही दोघीजणी प्रत्येक घरोघरी जाऊन कपडे , काही धान्य असं जमा करत राहिलो . माझ्या घरी कपड्यांचा ढीग लागला . मैत्रिणी कडे धान्य होतं.
एका शनिवारी, रविवारी मी ते कपडे धुतले . घड्या केल्या आईचं लुगडं चौपदरी करून त्यात ते कपडे बांधले . आणि आम्ही दोघी त्या गृहस्थाने गेलो . धान्य आणि कपडे घेऊन. आम्ही समाज सेवेचा पहिला पाठ गिरवत होतो . मनातून कमालीचा आनंद होता. असा आनंद ह्यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता.
त्यांनी आमचं भरभरून कौतुक केलं . आम्हीही सुखावलो . समाज हिताचं कार्य केल्याचं आम्हाला समाधान मिळालं.
मला वनिता विकास विद्यालयात नोकरी लागली हे सारं छान चाललं असतांना, एक दिवस कपडे घेऊन भांडी देणारी बाई आमच्या फाटका जवळ थांबली . तिच्या टोपल्यात भलं मोठं कपड्यांचं गाठोडे होतं. ते चौपदरी केलेलं आईचं लुगडं होतं . तिनं तांब्याभर पाणी मागितलं . आणि डोक्यावरचं गाठोडं आणि टोपली खाली ठेवली आणि पाय पसरून जमिनीवर बसली.
“आज चांगला सौदा झाला ” ती आनंदात होती .
पाणी दिल्यावर मी तिला गाठोडे सोडायला सांगितलं. तशी ती म्हणाली
“यात काय पह्याचं आहे माय.? एकानं बक्कळ कपडे दिलेत . आज आता जातो घरलाच .
” पण मला दाखव तर कपडे , मला ते घ्यायचे नाहीत फक्त पहायचे आहेत
” काय पन तुमचा शौक .” तिने ते गाठोडं उघडलं आणि आश्चर्य म्हणजे मीच धुवून घडी घालून ठेवलेले कपडे होते .
मी तिला विचारलं
“त्या बदल्यात तू काय दिलंस हिंडालियमचा गंज , चाळणी का आणखी काही ?”
“मी कायबी देल्लं नाही. म्याच त्या मानसाले संभर रूपये देल्ले ना. भला माणूस हाये तो बघा तो . हरेक मईन्याला मला तो कपडे देतो .”
“मग तू कर करत्येस ह्या कपड्यांचं ?”
” म्या व्हय? मी जून्या बाजारात ईकतो . मले संभरचे दोनसे भेटतात ना जी!”
पाणी पिऊन ती बाई निघून गेली . आई घरी नव्हती. कोणाला कसं सांगावं, काय करावं कळत नव्हतं .
महिनाभर घरोघरी जाऊन कपडे गोळा करणं , ते धुणं , त्या माणसाला नेऊन देणं ह्यात मिळालेला सारा आनंद संपला होता. आणि राग राग येत होता . खरंतर मला राग क्वचित येतो पण तो आता रौद्र स्वरूपात आला होता. अखेर शेजारी राहणाऱ्या आजोबांकडे गेले .
आणि माझा प्रचंड राग मी व्यक्त केला . ती शांत होते . मी म्हटलं
” माझ्या मैत्रिणी ला घेऊन त्यांच्याकडे जाते आणि चांगली खरडपट्टी काढते . पूरग्रस्तांना मदत म्हणून आम्ही हे काम निरपेक्ष भावनेनी केलंय . त्यांना ही मदत मिळायला हवी ना ?
हा तर त्या माणसाचा धंदाच झालाय , नैसर्गिक आपत्तीत असं वागणं योग्य आहे त्या माणसाचं?
तरीही ते आजोबा शांत होते. जेवढा म्हणून मला राग आला होता मी व्यक्त केली ला तरी ते शांत होते. मग मात्र मला त्यांचाही रागच आला. मी उठले आणि दाराकडे निघाले तेव्हा ते म्हणाले.
” तुम्ही निरपेक्ष भावनेनी कष्ट घेतलेत ना ? मग त्यात अपेक्षा चुकीची आहे. तुमची भावना उत्तमच आहे . त्यात कुठेही चुक नाही . पूर्वी गुप्तदान द्यायची पद्धत होती . आजही आहे . तेव्हा त्यात निरपेक्ष भावना होती . तशी ती आजही आहे.
तुम्ही दिलंत तुमची भूमिका संपली . त्या माणसाचा हिशोब ठेवायला आपण चित्रगुप्त नाही .
शिवाय समाजात अशी शेकडो माणसं आहेत जे आपली पोळी दुस-याच्या तव्यावर शेकून घेतात .
तिसरं असं पोरी , खरंच त्या माणसाला गरज असेल , ही एक संधी त्याला मिळाली , त्यातून त्या भांडीवालीचं भलं झालं आणि ते जे स्वच्छ कपडे तुम्ही नेऊन दिलेत ना , ते घालतांना गरीब माणसं सुखावतील. पटलं ना ?
एकूण ते कपडे गरीब माणसांकडेच पोहचले याचा आनंद मान “
“आजोबा पण हे काय बरोबर आहे का ?”
“अजून तुला समाजातली केवळ चांगलीच माणसं दिसलीत, समाजात स्वार्थी , संधी साधू , आपल्यापुरतं जगणारी , अत्याचारी , भ्रष्टाचारी माणसं आहेत तशी चार अतिशय निरपेक्ष , समाज हितवादी माणसं आहेत ज्यांनी हा समाजाचा तोल सांभाळताना जीवनाचं मोल दिलंय.
पण आज मी तुला एकच आशिर्वाद देईन की , तुझ्या प्रामाणिक कार्यात तुला चांगलीच माणसं मिळतील .”
मी समाधानाने घरी आले. मनात म्हटलं ” खरंच जर कुठे चित्रगुप्त असेल आणि तो माझ्या प्रत्येक कार्याची नोंद करणार असेल तर देवा, माझ्या प्रत्येक कार्यात तू माझ्यासह रहा. मला कधीही सोडून जाऊ नकोस . करशील ना एवढं ?”
मी देवा समोर हात जोडून उभी होते आणि डोळे गच्च भरून आले होते.

शुभांगी भडभडे

Leave a Reply