स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

नागपूर : १६ मार्च – माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेणार असल्याची शक्यता आहे. कोल्हापुरात ५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान स्वाभिमानीची वाटचाल भाजपशी युती होण्याच्या दिशेने होऊ शकते.
राजू शेट्टी सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक धोरणांना विरोध करत आहेत. वीज मिळावी या मागणीसाठी त्यांनी रास्ता रोको करत राज्य सरकारचा निषेध केला होता. शिवाय कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला लकवा मारलाय का? अशी जहरी टीकाही केली होती. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
वरुड-मोर्शी मतदारसंघाचे ‘स्वाभिमानी’चे एकमेव आमदार देवेंद्र भुयार निवडून आल्यापासून पक्षाच्या संपर्कात नाही. 24 मार्च रोजी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर हे वरुड-मोर्शीतील हिवरखेड इथे सभा घेणार आहेत. सभेच्या पोस्टरवर देवेंद्र भुयार यांचे नाव नाही आणि त्यांना सभेचे निमंत्रण नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे 24 मार्च रोजी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर आमदार भुयारांच्या मतदारसंघात काय तोफ डागतात याकडे लक्ष लागलं आहे.

Leave a Reply