योगी आदित्यनाथांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

लखनौ : ४ मे – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या ११२ च्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. अशाप्रकारे योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही काही पहिलीच घटना नाहीय. मात्र असं असलं तरी पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून या प्रकरणामध्ये सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरुन मेसेज आला आहे त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरु केलाय.
समोर आलेल्या माहितीनुसार २९ एप्रिल रोजी सायंकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या ११२ या क्रमांकाच्या व्हॉट्सअप एका अज्ञात क्रमांकावरुन मेसेज पाठवून योगींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीमध्ये मुख्यमंत्री योगींकडे चार दिवसांचा वेळ शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. पुढील चार दिवसात माझं जे काही करायचं आहे ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांना मी ठार मारणार आहे, असं या धमकीत म्हटलं आहे.
थेट मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या मेसेजमुळे पोलीस विभागामध्ये एकच गोंधळ उडालाय. धमकी ज्या क्रमांकावरुन आलीय त्या क्रमांकाचा तपास करण्यासाठी एक सर्व्हिलन्स टीम स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी येथील कंट्रोल रुममध्ये ११२ चे ऑप्रेशन कमांडर अंजुल कुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष टीम स्थापन करण्यात आलीय. ही टीम या प्रकरणामधील तपासावर लक्ष ठेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी मदत करणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एका १५ वर्षीय मुलाने ११२ याच आपत्कालीन सेवा क्रमांकावर मेसेज पाठवला होता. मोबाईल क्रमांकाच्या आधारे या मुला शोध घेतला असता तो आग्रा येथील असल्याचं समजलं. करोनामुळे शाळा बंद असल्याने वैतागलेल्या या मुलाने थेट मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मेसेजमधून दिली होती. या मुलाला अटक करुन बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं.

Leave a Reply