चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात महावितरणात झालेल्या कामांची चौकशी करण्याचे महाविकास आघाडीचे आदेश

मुंबई, 15 मार्च : केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी, कार्यालयांवर ठिकठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. या मुद्द्यावरुन राज्य सरकारकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजप ईडी, सीबीआय यांना हाताशी धरुन राज्य सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणत असल्याचा आरोप अनेकदा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार आणि भाजपचा सामना करण्यासाठी आता महाविकास आघाडीने नवी खेळी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात महावितरणात झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश जारी केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात महावितरणामध्ये झालेल्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. बावनकुळेंच्या 2014 ते 2019 या काळातील विविध कामांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या प्रकरणी तीन जणांची समिती सरकारने स्थापन केली आहे. ही तीन जणांची समिती याप्रकरणी चौकशी करणार आहे. दरम्यान, राज्य शासणाच्या या निर्णयावर बानकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सरकारचा चौकशीबाबतचा शासन निर्णय बघितला. 2014 ते 2019 या काळात महावितरणाच्या पायाभूत सुविधांमध्ये काही ऋटी राहिल्या आहेत. काही चुकी झाल्यात का त्या शोधण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. माझी सरकारला विनंती आहे की, या समितीने एक्सपर्ट घेतले पाहिजे. जेणेकरुन राज्य सरकारचा उद्देश त्यातून पूर्ण होईल. त्या समितीमध्ये संचालक आणि संकलन एवढीच ती समिती आहे, त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे”, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे.

Leave a Reply