पत्नी व मुलीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

नागपूर : १२ मार्च – नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली आहे. पत्नी आणि मुलीची हत्या करुन आरोपी पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आरोपी पतीने स्वत: देखील गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. नागपुरातील हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राजीव नगर येथे ही घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील राजीव नगर तरोडा मोहल्ल्यात ही घटना घडली आहे. मृतक व्यक्तीचं नाव विलास गवते असल्याची माहिती समोर आली आहे. विलास गवते याने रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नी आणि मुलीची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून विलास गवते या व्यक्तीने हे कृत्य केलं असल्याचं बोललं जात आहे. मध्यरात्री संपूर्ण गवते कुटुंब झोपलेले होते. त्यावेळी विलास गवते याने आपली पत्नी रंजना आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरोपी विलास गवते याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. मागील काही काळापासून तो आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यामुळे त्याचं आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडण होत होतं.हे हत्याकांड करण्याआधी आरोपीनं आपल्या 10 वर्षाच्या मुलाला दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवलं होते. झोपेत असलेल्या दहा वर्षीय मुलाला मध्यरात्री जाग आली. तेव्हा बहीण आणि आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून तो घाबरला. त्यानं शेजारी राहणाऱ्या काकाला आईच्या तोंडातून रक्त येत असल्याचं सांगितलं. काकांनी घरी येऊन पाहिलं असता, संबंधित प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या मदतीनं विलासचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा घराशेजारील एका झाडाला विलासनं देखील आत्महत्या केल्याचं दिसून आलं. यानंतर काकांनी हत्याकांडाची माहिती पोलिसांना दिली. आरोपी विलास गवते यानं हे टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास याचा दुधाचा व्यवसाय होता. अलीकडच्या काळात त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. त्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार केले जात होते. पण प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्यानं ते एका भोंदू बाबाकडून देखील उपचार घेऊ लागले होते. या हत्याकांडात भोंदूबाबाचा काही सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
तिघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण सुद्धा समोर येईल. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply