भिवापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांची ओली पार्टी, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

नागपूर : ११ मार्च – नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांची चक्क ओली पार्टी रंगली होती. अधिकारी दारूचे पेग रिचवत असतानाचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले असून सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत.
नागपुरातील शासकीय कार्यालयात सुरू असलेल्या या दारू पार्टीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच शासकीय कार्यालय हे नागरिकांच्या सेवा-सुविधेसाठी आहेत का कर्मचाऱ्यांना ओली पार्टी करण्यासाठी आहेत असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
नेटवर्क नसल्याचे कारण देत मुख्य कार्यालय अधिकारी रवी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयातील सर्व नोंदणीचे काम पुढे ढकलले. हे काम पुढे ढकलल्यानंतर या अधिकाऱ्यांनी सायंकाळी ५ वाजता दारु पिण्यास सुरुवात केली.
नोंदणीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांना हा प्रकार दिसल्याने त्यांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यामध्ये अधिकाऱ्यांचे हे कृत्य रेकॉर्ड केले. अधिकाऱ्यांची सुरू असलेली ही दारू पार्टी कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल सुद्धा होत आहेत.
या घटनेनंतर निबंधक कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भिवापूर पोलीस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तहसीलदारांनीही गांभीर्याने दखल घेत चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयासाठी एक वेगळी इमारत आधी नव्हती. त्यामुळे हे कार्यालय तहसील कार्यालयात सुरू होते. पण आता या कार्यालयासाठी वेगळी इमारत तयार करण्यात आली आहे. आता या ओली पार्टीच्या प्रकरणानंतर तहसीलदार कार्यालयात सुरू असलेले दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.

Leave a Reply