समाजभवनासाठी संविधान चौकात बंजारा समाजाचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

नागपूर : ११ मार्च – बंजारा समाजाचा मोठा वर्ग नागपुरात राहत असूनही आतापर्यंत एकही समाजभवन दिले नसल्याची खंत व्यक्त करीत, समाजातील महिलांनी संविधान चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ‘स्थानिक विकास प्राधिकरण आणि नेत्यांनी आम्हाला केवळ आश्वासन दिले. त्याची पूर्तता करण्यात यावी’, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.
बंजारा समाज नागपुरात फार पूर्वीपासून वास्तव्यास आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहात असलेला हा समाज आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहे. समाजाचे सांस्कृतिक वैभव टिकून राहावे, विविध उपक्रमांसाठी हक्काची जागा मिळावी यासाठी समाजभवन बांधून देण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहारही करण्यात आले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असे समाजाचे म्हणणे आहे.
संविधान चौकात नलिनी पवार, राजश्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात प्रीत राठोड, अर्चना राठोड, नीता पवार, कीर्ती चव्हाण, उषा राठोड, संगीता पवार, बिंदू पवार, शीतल राठोड, सरिता राठोड, कल्पना चव्हाण, अबिता जाधव, पुष्पा राठोड, ललिता जाधव, प्रतिभा चव्हाण, सोनाली पवार, शोभा चव्हाण, नलिनी नाईक, सरला चव्हाण, छाया राठोड, ज्योती जाधव, वंदना चव्हाण, समित्रा राठोड, रूपाली जाधव, श्वेता राठोड, डॉ. पूनम चव्हाण, इंदूताई राठोड, संध्या चव्हाण, गायत्री जाधव आदींनी सहभाग घेतला. माजी खासदार विलास मुत्तेमवार, नायक आत्माराम चव्हाण, पिरूसिंग राठोड, प्रा. एम. डी. चव्हाण, प्रा. वसंत पवार, टी. एन. चव्हाण, अनिल महाराज, डॉ. गणेश चव्हाण, देवराव राठोड, उमेश पवार, प्रदीप राठोड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.
‘तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समाजभवनासाठी २०१८मध्ये अर्ज करण्यात आला होता. फडणवीस यांनी तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हे पत्र पाठवून याची दखल घेण्याची सूचना केली. बावनकुळे यांनी हे प्रकरण नासुप्रकडे पाठविले. नासुप्रकडून वर्धा मार्गावरील इंगोले लेआऊट येथील जागा देण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली. याच विषयावर नासुप्र येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जागा देण्याबाबत काही अडचणी आहे का हे तपासून बघण्यासाठी २५ दिवसांचा अवधी नासुप्रच्या तत्कालीन सभापती शीतल उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर नासुप्रकडून बंजारा समाजाला समाजभवनासाठी इंगोले लेआउट येथील जागा देण्यात येत असल्याचे पत्रही जानेवारी २०२१ मध्ये प्राप्त झाले. नासुप्रकडून जागा मिळाल्याचे पत्र मिळताच दुसरीकडे महामेट्रोकडून ही जागा देण्यास नकार देणारे पत्र प्राप्त झाले. ही आमची फसवणूकच आहे’, असा रोष सती सामकी माता बंजारा समाजाच्या सचिव नलिनी पवार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply