मेमरीतला डेटा – अविनाश पाठक

हरहुन्नरी कलावंत विनय आपटे

आज सकाळी व्हॉट्सअॅिप बघत असताना अचानक वैजयंती आपटेंची एक पोस्ट दिसली. त्यांचे दिवंगत पती विनय आपटे यांनी अटलबिहारी वाजपेयींवर बनवलेली एका फिल्मची व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल केली होती. ती बघून विनय आपटेंच्या सगळ्याच आठवणी जाग्या झाल्या.
विनय आपटे हे एक गाजलेले रंगभूमी कलावंत होते. त्याचबरोबर ते निर्माते, दिग्दर्शक, सल्लागार अशा विविध भूमिकांमध्ये वेळोवेळी कार्यरत असायचे. जवळजवळ 45 वर्ष त्यांनी रंगभूमी आणि छोटा पडदा गाजवला होता. त्यातच अनेकदा मोठ्या पडद्यावरही ते झळकून जात होते. त्यामुळे मराठी कलाविश्वासत विनय आपटे हे नाव सर्वानाच परिचित झाले होते.
असा हा गुणी कलावंत माझाही चांगला मित्र होता. ही माझ्या करता तर भाग्याचीच बाब म्हणावी लागेल. विनयचे माझे स्नेहबंधही जवळजवळ 40 वर्ष टिकले. आम्हा दोघांमध्ये एक चांगले मैत्र निर्माण झाले होते.
विनयचे नाव निघताच मी 1976-77 च्या कालखंडात पोहोचलो. 1976 साली मुंबई दूरदर्शनला नागपुरातून एक प्रतिनिधी छायाचित्रकार हवा आहे. असे कळल्यामुळे मी प्रयत्न सुरु केले होते. तिथे काही नागपूरकर स्नेहांच्या मदतीने माझ्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यासाठी अधूनमधून मी मुंबई दूरदर्शन केंद्राला जात असे. तिथे मुळचे नागपूरकर असलेले आकाशानंद हे निर्माते कार्यरत होते. आकाशानंद म्हणजेच आबांशी माझा चांगला परिचय झाला होता. आबा ज्या खोलीत बसायचे त्याच खोलीत बाजूच्याच टेबलवर एक देखणा तरुण बसायचा. एक दिवस आबांनी माझी ओळख करुन दिली. ‘अविनाश हा विनय आपटे’ विनय त्यावेळी युवादर्शन कार्यक्रमाचा निर्माता म्हणून कार्यरत होता. अनेक नवेनवे प्रयोग करणारा तरुण निर्माता म्हणून तो विख्यात होता. हळूहळू त्याची माझी वेव्हलेग्थ जुळू लागली.
त्या काळात विनय नोकरी सांभाळून खाजगी नाटके तर करतच असे. शिवाय इतरही वेगवेगळे प्रयोग करत असे. तो जमाना रेडिओ आणि टिव्हीवर जाहिराती करण्याचा होता. या जाहिराती तयार करण्याचे काम विनय त्या काळात करायचा. दूरदर्शनमध्येच कार्यरत असलेला फ्लोअर मॅनेजर सुधीर पाटणकर हा नागपूरकर माझा मित्र होता. तोही विनयबरोबर काम करायचा. एक दिवस मी विनय आणि सुधीर दूरदर्शनच्या टॉवरखाली असलेल्या टपरीवजा कँटीनमध्ये वडापाव खात असताना तेथे नागपुरातूनही आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी जाहिराती तयार करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानंतर आमच्या भेटीगाठी आणि चर्चांना वेग आला. विनयच्याच सुचनेवरुन आम्ही नागपुरातून एका जाहिराती एजेंसीचेही पंजीकरण करुन घेतले.
याच दरम्यान देशभरात दूरदर्शनचे जाळे विणले गेले. त्यामुळे मग आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या जाहिरातीनाही खूप महत्त्व आले. मी दूरदर्शनसाठी कार्यक्रम निर्मिती केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी माझी धडपड सुरु झाली. त्यातही विनयचे सहकार्य मी घेत होतो.
या दरम्यान विनय दूरदर्शनसोबतच रंगभूमीही गाजवत होता. मला आठवते 1980 मध्ये ‘आक्रोश’ हा गाजलेला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्याबद्दल खूप उलटसुलट बातम्या येत होत्या. म्हणून आवर्जुन हा चित्रपट बघायला मी गेलो होतो. चित्रपट बघता बघता अचानकच एका भूमिकेत विनय मला झळकलेला दिसला. आपला कुणीतरी मित्र चक्क चित्रपटात काम करतो आहे हे बघून मी मनोमन सुखावलो होतो. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये आणि दूरदर्शनवरही विनय झळकू लागला होता.
दूरदर्शनवर येण्यापूर्वी विनय रंगमंच कलावंतच होता. 1972, 73, 74 या काळात दरवर्षी राज्य शासनाचे उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक त्याने घेतले होते. याच पुण्याईवर त्याचे दूरदर्शनमध्ये आगमन झाले. दूरदर्शनची ही साथ त्याला जवळजवळ 14 वर्ष पुरली. 1987-88 च्या दरम्यान त्याची मुंबईहून नागपूरला बदली केली गेली. त्यावेळी मुंबई दूरदर्शनचे संचालक कुणाचेही पटले नाही की त्याला शिक्षा म्हणून नागपूरला पाठवायचे. विनयच्या बाबतीही तेच झाले. त्याची नागपूरला बदली करण्यात आली. त्याने ती रद्द करण्याचा प्रयत्न निश्चित केला. मात्र रद्द होत नाही असे पाहून त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ दूरचित्रवाणी आणि नाट्य निर्मितीमध्ये तो सक्रिय झाला.
याच काळात मी देखील काही कारणांनी दूरदर्शनपासून दुरावलो होतो. नंतर मी पूर्णवेळ पत्रकारितेत आलो. तेव्हा अधूनमधून पुन्हा विनयच्या भेटी सुरु झाल्या. विधीमंडळ वृत्तांकनासाठी मी मुंबईला येत असे. तेव्हा विनयची नेहमी भेट व्हायची. कालांतराने पत्रकार असलेल्या विनयच्या सुविद्य पत्नी वैजयंती यांच्याशीही माझा परिचय झाला. त्या काळात खाजगी वृत्तवाहिन्यांचे भरपूर पीक आले होते. झी समूहाची समोर आलेली ‘अल्फा’ ही वृत्तवाहिनी, ‘स्टार’ची तारा, ‘ई-टिव्ही’ या वृत्तवाहिन्यांपैकी एखाद्या वृत्तवाहिनीत मी सक्रिय व्हावे यासाठी विनयनने बराच आग्रह धरला होता. माझ्यासाठी काही वाहिन्यांच्या संपादकांकडे त्याने शब्दही टाकला होता. मात्र ते जमले नाही.
याच काळात मी स्वतःचे नियतकालीही सुरु केले. त्यात मी व्यस्त होऊन गेलो. त्यामुळे पूर्वीसारख्या भेटी कमी झाल्या तरीही कधीमधी विनय भेटायचाच. अन्यथा वैजयंतीकडून त्याचा हालहवाल कळायचा. त्याची भेट होत नसली तरी मालिका आणि चित्रपटात तो अधूनमधून दिसायचाच. मग कधीमधी फोनवर बोलून परस्परांचे समाधान करून घेतले जायचे.
असा हा हरहुन्नरी कलावंत आणि मनस्वी माणूस 2013 मध्ये अचानक सर्वांनाच सोडून निघून गेला. ते काही विनयचे जाण्याचे वय नव्हते. मात्र तरीही त्याचे तिथले आयुष्य संपल्यामुळे जावे लागले. विनय एक गुणी कलावंत होता. तो दीर्घकाळ जपता तर त्याने फक्त मराठीच नव्हे तर भारतीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्यश्रृष्टीला मोलाचे योगदान दिले असते हे निश्चित.

अविनाश पाठक

Leave a Reply