वाराणसीतून सरकारने ईव्हीएम मशिन्स चोरी केल्याचा अखिलेश यादव यांचा आरोप

लखनऊ : ९ मार्च – उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठे आव्हान देणाऱ्या समाजवादी पक्षाने आज वाराणसीतील मतमोजणी केंद्रातून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) नेल्या जात असल्याचा आरोप केला आहे. सरकारने ईव्हीएम मशिन्स चोरी केल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. २०१७ मध्ये सुमारे ५० जागांवर भाजपच्या विजयाचे अंतर ५,००० मतांपेक्षा कमी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ईव्हीएमचा वापर प्रशिक्षणासाठी केला जात होता आणि त्यांचा वापर मतदानासाठी करण्यात आला नाही. याबाबत संपूर्ण माहिती देत वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अखिलेश यादव यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
काही राजकीय पक्ष अफवा पसरवत आहेत, असा आरोप वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी केला. निवडणुकीत वापरलेले सर्व ईव्हीएम सीआरपीएफच्या ताब्यात असलेल्या स्ट्राँग रूममध्ये सील करण्यात आले आहेत आणि ते सीसीटीव्ही देखरेखीखाली आहेत. त्यावर सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे बारकाईने लक्ष आहे, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.
बाजार समितीमधील येथील अन्न गोदामात बांधलेल्या वेगळ्या गोदामातून ईव्हीएम यूपी कॉलेजमध्ये जात होते. मोजणीच्या कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे उद्या दुसरे प्रशिक्षण आहे आणि या मशीन्सचा वापर नेहमी व्यावहारिक प्रशिक्षणासाठी केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “वाराणसीमध्ये आम्ही एक ट्रक थांबवला आणि दोन ट्रक पळून गेले. जर काही संशयास्पद नव्हते, तर मग ईव्हीएम असलेले दोन ट्रक कसे पळून गेले? उमेदवारांच्या सहमतीशिवाय तुम्ही ईव्हीएम कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे एक प्रधान सचिव जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत आहेत आणि जिथे भाजपचा पराभव होत आहे, तिथे संथ गतीने मोजणी झाली पाहिजे, असे ते सांगत आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. आता ईव्हीएम पकडले गेले आहेत, त्यामुळे अधिकारी अनेक कारणं पुढे करत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने ५००० पेक्षा कमी मतांच्या फरकाने ४७ जागा जिंकल्या होत्या, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.
वाराणसीमध्ये ईव्हीएममध्ये नेताना पकडले गेल्याने यूपीच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सतर्क राहण्याचा हा संदेश देत आहे. मतमोजणीत हेराफेरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सपा-आघाडीचे सर्व उमेदवार आणि समर्थकांनी आपल्या कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेववी. लोकशाही आणि भवितव्याच्या रक्षणासाठी मतमोजणीत तरुणांनी सैनिक बनून काम करावं, असे अखिलेश यादव ट्विटमध्ये म्हणाले.

Leave a Reply