संपादकीय संवाद – नितीन गडकरी यांचा स्वागतार्ह निर्णय

नागपूर शहरात विद्यापीठ परिसर चौक ते आरटीओ चौक या रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचे काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी या उड्डाणपुलाला महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि ज्ञानयोगी म्हणून गाजलेले माजी राज्यसभा सदस्य कै डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव देण्याचा निर्णय गडकरींनी जाहीर केला. गडकरींचा हा निर्णय समयोचित म्हणावा लागेल.
तसे बघता डॉ. श्रीकांत जिचकार आणि नितीन गडकरी या दोघांचे पक्ष भिन्न होते, राज्याच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी नितीन गडकरी आणि डॉ. श्रीकांत जिचकार हे दोघेही विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय होते. त्या काळात नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. श्रीकांत जिचकार यांनी नितीन गडकरी यांचा १९७७ साली २ मतांनी पराभव केला होता. अर्थात राजकारणात मतभेद असावे मात्र मनभेद नको, असे मानणाऱ्या संस्कृतीतून डॉ. जिचकार आणि गडकरी या दोघांचीही जडणघडण झाली होती. त्यामुळेच भिन्न राजकीय भूमिका असतानाही जिचकारांचे मोठेपण मान्य करत गडकरींनी त्या उड्डाणपुलाला जिचकारांचे नाव देण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय म्हणावा लागेल.
डॉ. जिचकार हे फक्त राजकारणीच नव्हते तर एक अभ्यासू आणि विद्वान व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले होते. एमबीबीएस परीक्षेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या जिचकारांनी नंतर अनेक परीक्षा देत पुरस्कार मिळवले. आणि आपली विद्वता सिद्ध केली. आयएएस आणि आयपीएस या परीक्षाही त्यांनी उत्तीर्ण केल्या होत्या. ते राजकारणात ना येते तर सनदी अधिकारी म्हणून गाजले असते. हिंदू वेदविद्या, वेदशास्त्र, रामायण महाभारत यांचा जसा त्यांचा अभ्यास होता तसाच अर्थसंकल्पीय मुद्द्यांवरही त्यांचा अभ्यास होता. राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी प्रशासन आणि व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठीही नवनवे प्रस्ताव ठेवले होते. ते अधिक काळ जगले असते तर त्यांनी अमूल्य से योगदान दिले असते.
रस्त्यांवर उड्डाणपूल उभारण्यामागे वाहतूक कोंडी न होता, अपघात टाळले जाणे हा प्रमुख हेतू असतो. डॉ. जिचकार यांचा शेवटही रस्ते अपघातातच झाला होता. बाजारगावजवळ एसटीच्या धडकेत त्यांचा करून अंत झाला होता. हा मुद्दा लक्षात घेतल्यास अपघात टाळण्यासाठी उभारलेल्या पायभूत सुविधेला जिचकारांचे नाव देणे हा एक योग्य निर्णय ठरतो. त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच व्हायला हवे. डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती उड्डाणपूल उभा झाल्याने डॉ. जिचकार यांची सुटी चिरंतन राहील, याबाबत कुणाच्याही मनात शंका राहणार नाही.

अविनाश पाठक

Leave a Reply