अरविंद उवाच – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

कोश्यारींना वेगळा न्याय का नाना ?

शिवाजीला आदर्श मानून आणि त्याच्या मातृभूमी समर्पित उत्तुंग परंपरेचा पाईक बनून थोडीफार जरी देशसेवा करता आली तरी आपले जीवन सार्थकी लागले असे मानणाऱ्या लोकांचा वर्ग बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुदैवाने अजून अस्तित्वात आहे. दुसराही एक वर्ग आपल्या इथे आहे. आपली जेव्हढी जाडी आणि उंची तेव्हढ्या मापात शिवाजीला बसविण्याचा उद्योग ही मंडळी करीत असतात. अशा माणसांची जी नीतिमत्ता असते तिला तेलपाणी बहुधा काँग्रेस संस्कृतीने केलेले असते. तसा एक वाद महाराष्ट्रात रंगण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. निमित्त आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. मराठी भाषा दिन आणि दासनवमी हे मुहूर्त साधून समर्थ साहित्य परिषदेने संभाजी नगर म्हणजे अजूनही अधिकृत औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.भाषण जसे झाले तसे आणि सविस्तरपणे वाचावयाला मिळालेले नाही. जे काही तुटपुंजे हातात पडले त्यावरून इतकेच कळले की राज्यपालमहोदय गुरु माहात्म्य सांगत होते. त्यांनी चाणक्य-चंद्रगुप्त गुरुशिष्य स्फूर्तिदायक संबंधाचा उल्लेख केला आणि त्याच सुरात त्यांनी समर्थ रामदास आणि शिवछत्रपतींचा एकत्रितपणे जयजयकार केला.माणूस कितीही मोठा असला तरी गुरूवाचून त्याच्या जीवनाला अपूर्णता येते असेही भाष्य त्यांनी केले. त्यामुळे नाना पटोले ह्यांचा पोटशूळ उठला. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपला प्रत्येक शब्द म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या मातीचा हुंकार आहे असा समज त्यांनी करून घेतलेला दिसतो. शिवाजी महाराजांचा संबंध रामदास स्वामींशी जोडणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात असल्याची भावना त्यांनी करून घेतलेली दिसते. त्यामुळे अशा लोकविरोधी राज्यपालांना परत बोलवा अशी मागणी ते केंद्र सरकारकडे करणार आहेत.
त्यासाठी लोकांनी मोठे आंदोलन उभारावे अशी साहजिकच त्यांची अपेक्षा आहे. राज्यसभेच्या सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे ह्याही वादात उतरल्या आहेत. रामदास आणि शिवाजी ह्यांचे गुरुशिष्य संबंध असल्याचा पुरावा कोठेही सापडत नाही असे अधिकारवाणीने सांगून शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडात रामदास कोठेही आढळत नाहीत असे विद्वत्तापूर्ण विधान त्यांनी केले आहे.विश्वासघाताने बनविलेले महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र प्रदेशात राज्य करीत आहे. आघाडीचे अग्रीम आयोजक शरद पवार आहेत. सर्वसामान्य भारतीयाची काँग्रेस संस्कृतीने गोठवलेली ऊर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे भाजप सरकार हळूहळू मोकळी आणि कार्यान्वित करीत आहेत. ह्या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम पवार करीत आहेत. पण त्यांचे दाऊद इब्राहीम आणि एकंदर गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध ह्याविषयी इथेतिथे जे बोलले जात होते ते खरे असल्याचे सिद्ध करण्याचा विडा त्यांच्या साथीदारांनी उचललेला दिसतो.त्यांचे काही मंत्री गजाआड झाले असून काही रांगेत उभे आहेत.महाराष्ट्राची सर्व देशात एव्हढी अपकीर्ती आजपर्यंत कधी झाली नव्हती. एव्हढे भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने आजवर पाहिले नव्हते. ते लांच्छन झाकण्यासाठी समर्थ रामदासांच्या निमित्ताने ब्राह्मणब्राह्मणेतर वाद पेटवून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न काँग्रेस संस्कृतीचे शिलेदार करु लागले आहेत. ह्या वादाची दखल केंद्र सरकार, न्यायालये, सुबुद्ध आणि स्वदेशप्रेमी मराठी जनता न्यायबुद्धीने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून घेईल. शिवाजी आणि रामदास ह्यांचे नेमके संबंध कसे होते ह्याची माहिती इतिहासकारांना साक्ष ठेवून आपण घेऊ. त्याआधी काँग्रेस संस्कृतीचा रामदासांना विरोध का हे समजून घेऊ. शिवाजी महाराजांच्या मानापमानाविषयी बोलण्याचा काँग्रेस संस्कृतीला काही अधिकार आहे का तेही तपासून पाहू.

                     " पहिले ते हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण । तिसरे ते सावधपण । सर्वविषयी ।। हा रामदासांचा श्लोक सर्वविदित आहे. ह्यातील राजकारण शब्दाला आणि त्या शब्दातुन जे ध्वनित होते त्याला  जागून रामदासांनी जे दैवी राष्ट्र निर्माण कार्य महाराष्ट्रात उभे केले त्याला काँग्रेस संस्कृतीचा आक्षेप आहे. नव्या पिढीला हे कळून आश्चर्य वाटेल की राजकारण हा शब्द म्हणजे रामदासांनी मराठी भाषेला दिलेली देणगी आहे. त्यांच्याआधी मराठी साहित्यात राजकारण हा शब्द कोणी वापरला नव्हता. परमेश्वराशी एकरूप होणे हे मनुष्यजातीचे अंतिम लक्ष्य आहे. त्यासाठी भजनकीर्तनाचा गजर होत राहिलाच पाहिजे. परंतु देवभक्त लोकांनी ह्या पृथ्वीतलावर कसे जगले पाहिजे ते समजून घेण्यासाठी राज्यकर्त्यांनी आणि समाजधुरीणांनी राजकारण केले पाहिजे. देवभक्तीत लीन होतांना तेव्हढ्याच नम्रतेने आणि निष्ठेने देशभक्तीही केली पाहिजे हे उपदेशिणारा पहिला संत म्हणजे समर्थ रामदास. दासबोधात राजकारण शब्द सत्तावीस वेळा आला आहे. आपण पारतंत्र्यात होतो. इस्लामच्या क्रौर्याने आणि बीभत्सपणाने आपण भयभीत झालो होतो. जगण्यातला राम संपला होता.मंदिरे आणि माताभगिनी वेचून वेचून भ्रष्ट केल्या जात होत्या. स्वतःचा संसार बाजूला सारून रामदासांनी कितीतरी वर्षे साधुवृत्तीने पण सजगपणे भारतभ्रमण केले तेव्हा हिंदू किती हीनदीन झाला आहे हे त्यांना कळले आणि त्यांचे अंत:कारण पिळवटून निघाले.तीर्थक्षेत्र काशीला त्यांनी एकांत केला. देवदेशचिंतन केले. हिंदू समाज ,संस्कृती आणि राष्ट्र समूळ नष्ट करू पाहणाऱ्या मुघल राज्यकर्त्यांना चारी मुंड्या चीत केले पाहिजे ,लोकांना राजकीयदृष्ट्या संघटित  करून आणि त्यांना शक्तीची उपासना करायला लावून सगळा हिंदुस्थान  स्वतंत्र करण्याची प्रेरणा महाराष्ट्राला झाली पाहिजे ह्यासाठी आपले आयुष्य वेचायचे त्यांनी ठरविले. काशीला त्यांनी ' आनंदभुवनीं ' नावाचे ५९ कडव्यांचे अत्यंत स्फूर्तिदायक काव्य रचले. आधुनिक भाषेत बोलायचे तर तो त्यांचा ' मॅनिफेस्टो ' होता.ते त्या काळातले भारताचे राष्ट्रगीत आहे. त्यात तेव्हा सर्वशक्तिमान राज्यकर्त्यांचा उल्लेख ' औरंग्या ' असा एकेरी आहे. त्याला बुडवायचा आणि म्लेंच्छसंहार करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी आशीर्वाद आणि बळ ह्यांच्या साह्याने मराठी माणसाला दिव्यत्व प्राप्त व्हावे म्हणून रघुकुलतिलक रामचंद्रांची आणि त्याच्या एकनिष्ठ सेवकाची म्हणजे हनुमानाची नवे देव म्हणून प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरले. रामाची यथार्थ निवड केली कारण तो बंधविमोचक आहे , त्याने रावणाच्या तावडीतून देवांची सुटका केली आहे. नवनिर्माणाची पूर्ण योजना आणि कार्यक्रम मनी  साठवून तिशीत असतांना रामदासांनी महाराष्ट्र प्रवेश केला आहे. त्यावेळी मूर्तिभंजनाचा एकमेव कार्यक्रम महाराष्ट्र देशी सर्वत्र चालू होता. मूर्ती वाचविण्यासाठी त्या नद्यांमध्ये पाण्यात लपवून ठेवल्या जात होत्या. रामदासांनी स्वतः बुड्या मारून कृष्णेच्या पाण्यातून अशा अनेक मूर्ती बाहेर काढल्या आणि त्यांची देवळात पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली. मूर्ती लपवायच्या नाहीत तर त्यांची प्रगट पूजा करायची आणि त्यासाठी हाती शस्र घेऊन लढायचे असा नवा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्राला दिला. चाफळला त्यांनी वीर मारुतीची प्राणप्रतिष्ठा केली त्या उत्सवाला पंधरा वर्षाचे शिवाजी राजे उपस्थित होते. मन्वंतर घडत होते आणि ह्या नवनिर्माणाला संतमंडळींचा पाठिंबा होता. शिवाजी महाराज परमेश्वर चिंतनात निमग्न होणारे राजकीय व्यक्तिमत्व होते. पुढे एकदा उपदेशग्रहणासाठी ते तुकाराम महाराजांकडे गेले तेव्हा , " मी परमार्थ सांगेन पण तुला खरी सत्संगत रामदासाची आवश्यक आहे असे सांगून तुकारामाने त्यांना रामदासाकडे पाठविले असे उल्लेख आहेत ० " तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हाची देखता " असे साकडे रामदासांनी रामवरदायिनी तुळजाभवानीला घातले आहे.तुझे पूर्वीचे पराक्रम ऐकले आहेत पण आता माझ्या राजाच्या मागे पर्वतासारखी खंबीरपणे उभी राहा आणि काही रोकडे सामर्थ्य दाखव अशा शब्दात त्यांनी देवीशी भांडण केले आहे.

                ममराठमोळ्या रसवंतीचे राजराजेश्वर श्रीपाद महादेव माटे ह्यांनी ' श्री रामदासस्वामींचे प्रपंचविज्ञान ' ह्या ग्रंथात  शिवाजी महाराज आणि रामदास ह्यांच्या संबंधांवर सुंदर भाष्य केले आहे. तुकाराम ,रामदास आणि शिवाजी ह्या तीन अत्यंत थोर विभूती एकाच काळात महाराष्ट्रात संचार करीत आहेत. मनुष्य स्वतंत्र असेल तर त्याच्या व्यक्तिमत्वातील लपलेले ब्रह्म जागृत करण्यासाठी आवश्यक अशा कला आणि ज्ञान आसमंतात मुक्तपणे विहार करीत असतात. म्हणून स्वतंत्रतादेवीची उपासना करून तिच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ह्या तीन महात्म्यांनी महाराष्ट्रासाठी अभ्यासक्रम निश्चित केला होता आणि तो घोटवून घेण्याचे वर्ग नेटाने सुरु झाले होते. तुकाराम महाराज सात्विकता जागृत करीत होते आणि तिचे बावळटपणात रूपांतर होऊ नये म्हणून आवश्यक ती काटछाट करीत होते. रामदासस्वामी संघटनाचे महत्व सांगत होते आणि संन्यासी झाला तरी तो युद्धमान अवस्थेत सदैव जागृत असला पाहिजे ह्याची दक्षता घेत होते.मारुतीच्या अंत:करण्यात रामाचे जे स्थान ते मराठी माणसाच्या मनात देशाचे असले पाहिजे तसेच रामाची आणि देशाची सेवा करण्यासाठी दास मारुती कधी बनायचे आणि वीर मारुती कधी बनायचे ह्याचे भान त्याला असले पाहिजे म्हणून ते अहर्निश झटत होते.शिवाजी महाराज शत्रुमित्रविवेक धारदार करत होते आणि विजयाचे दिवस पाहण्याची सवय मराठी माणसाला लागली पाहिजे म्हणून नवीनवी आव्हाने झेलण्याची आमंत्रणे तरुणांना देत होते. हे तिघे एकमेकांना व्यवस्थित ओळखत होते. तिघांचे कार्य एकमेकांना पूरक होते. तिघांनी एकमेकांवर मात करण्याचा आणि परस्परांच्या कार्यात काड्या घालण्याचा विचारही कधी केला नाही.माटे म्हणतात की असा विभूतींचा त्रिवेणी संगम क्वचितच घडून येतो. न्यायमूर्ती रानड्यांपासून रियासतकार सरदेसायांपर्यंत मराठ्यांच्या इतिहासावर ज्यांनी लिहिले आहे त्या सर्वांनी शिवाजी आणि रामदास एकमेकांच्या संबंधात होते आणि त्यांचे कार्य परस्परपूरक होते असेच म्हटले आहे . शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे होते आणि तशी परमेश्वराची इच्छा आहे अशी  त्यांची श्रद्धा होती. सर्व मराठी माणसाच्या मनात ही श्रद्धा बळकट स्वरूपात अवतीर्ण व्हावी म्हणून रामदास झटत होते. संत तुकाराम पांडुरंगाच्या चरणी प्रतिदिनी जे साकडे घालीत त्यात शिवाजीला यश मिळो असे आवाहन समर्पित झालेले असे. न.र.फाटक हे एकच इतिहासकार आहेत की जे शिवाजी-रामदास भेटीविषयी साशंक आहेत आणि रामदासानी राजकारण केले असे त्यांना वाटत नाही. शिवाजी-रामदास भेटीचा जे लोक पुरावा मागतात त्यांनी एका पैलूचा विचार केलेला बरा. शत्रूची धाड केव्हाही पडून दाणादाण उडण्याचा तो काळ होता. वातावरणात अतोनात असुरक्षितता होती. अशा परिस्थितीत शिवाजी आणि रामदास दैनंदिनी लिहून भेटींचे विवरण मांडून  ठेवीत असतील ही  शक्यता नाही. आधुनिक काळापुरते बोलायचे तर यशवंतराव चव्हाण आणि पी व्ही नरसिंहराव ह्यांनी नेहरूंना घाबरून सावरकरांशी संबंध ठेवायला आपण कसे कचरत होतो ते सांगितले आहे. इंग्रजांनी केला नाही इतका द्वेष नेहरूंनी सावरकरांचा केला. त्यामुळे सावरकरांना त्यांच्या आयुष्यातील आणि आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्वाच्या सर्वच घटनांचे पुरेसे विवेचन करता आलेले नाही.  भालजी पेंढारकरांनी मी त्यांच्या क्रांतिकार्याविषयी विचारले तेव्हा अनधिकारी व्यक्तीला मी एक शब्दही सांगणार नाही अशी तेव्हा शपथ घेतली आहे असे त्यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे भालजींच्या क्रांतिकार्याचा इतिहास त्यांच्याबरोबर काळाच्या उदरात गडप झाला.एव्हढे सगळे माहीत असूनही काँग्रेस संस्कृती रामदासांना शिवाजी महाराजांपासून तोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न का करते ? 

                     त्याचे कारण काँग्रेस संस्कृतीच्या ध्येयवादात दडलेले आहे. काँग्रेस संस्कृती इस्लामी आक्रमकांना शत्रू मानत नाही. काँग्रेस संस्कृती इस्लामी ध्येयवादाला परका समजत नाही. आपल्या धर्माला आणि राजकीय तत्वज्ञानाला अनुसरून ह्या भूमीवर आपली सत्ता आणि आपले भावविश्व स्थापन करण्याचा मुसलमानांना हिंदूंइतकाच हक्क आहे असे काँग्रेस संस्कृती धरून चालते. म्हणून काँग्रेस कार्यकारिणीने भारतातून फुटून निघण्याचा मुसलमानांचा हक्क तसा ठराव करून मान्य केला आहे. काँग्रेसला खरे म्हणजे शिवाजीच नको आहे. पण तसे उघड म्हणता येत नाही म्हणून तो राग ते रामदासावर काढतात. रामदास शिवाजीचे गुरु आहेत असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले असा संशय येऊन नाना पटोले त्यांना राज्यपालपदावरून हाकलवू पाहत आहेत. शिवाजी हा वाट चुकलेला देशभक्त आहे असे सरळसरळ म्हणणाऱ्या मोहनदास करमचंद गांधींचे ते काय करणार आहेत ?  कोश्यारींनी शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. त्यांचे कार्य हीन लेखलेले  नाही. त्या दोघात गुरुशिष्य संबंध असावेत असे त्यांना वाटते. त्याविषयी मतभेद होऊ शकतो. पण कोश्यारी ह्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असे म्हणता येत नाही. रामदासाचे हातून राष्ट्रविघातक कृत्य घडले असते आणि त्यांचा शिवाजी महाराजांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला असता तर ते आक्षेपार्ह ठरले असते. वास्तव असे आहे की शिवाजी आणि रामदास ह्यांच्यात आचार आणि विचार ह्यामध्ये संपूर्णपणे एकवाक्यता आहे. तरीसुद्धा पटोले कोश्यारींना अपराधी समजत आहेत. मग ते नेहरूंची वासलात कशी लावणार आहेत ? नेहरूंनी शिवाजी नाकारला आहे. शिवाजीचा राष्ट्रवाद ह्या भूमीत जन्माला आला असला तरी त्याहून विशाल राष्ट्रवाद आम्हास रूढ करायचा असल्याने शिवाजी आमच्या उपयोगाचा नाही असे नेहरूंचे मत आहे. नेहरूंचा विशाल राष्ट्रवाद देशाची फाळणी रोखू शकला नाही. काश्मीरचा प्रश्न त्याने जटिल बनविला. नेहरूंचा राष्ट्रवाद देशाची एकात्मता सांभाळू शकला नाही. मुसलमानांना आवडत नाही म्हणून शाळांतून अफजलखान वधाचा  धडा शिकवायचा नाही असा निर्णय मुंबई सरकारने घेतला. पट्टाभी सीतारामय्या  अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी मंदिरे पडून तेथे मशिदी उभारण्याच्या औरंगजेबाच्या कृत्याचे समर्थन केले. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचा निषेध पटोले ह्यांच्याकडून अजून व्हायचा आहे.  राम हे काल्पनिक पात्र आहे असे काँग्रेसने प्रतिज्ञापत्रावर न्यायालयात लिहून दिले आहे. त्याची थोडीतरी लाज पटोले ह्यांना वाटते आहे काय ? सोनिया गांधी भारताच्या नागरिक झाल्या नव्हत्या तेव्हा कितीतरी वर्षे त्या भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी राहत होत्या हे कृत्य निश्चितच निषेधार्ह आहे. पटोले  ह्यांचे काय म्हणणे आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ह्यांनी उत्पन्न केलेल्या वादामुळे एक चांगली गोष्ट लक्षात आली.

ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे वाचायला लागल्या आहेत. वाचनाचा छंद चांगला समजला जातो. ग्रंथ हे गुरु आहेत असे मानले जाते त्या जसा वाचनाचा वेग वाढवतील तसे त्यांच्या लक्षात येईल की शरद पवार स्वतःला ‘ जाणता राजा’ म्हणवून घेतात हे चांगले नाही त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान होतो तसा समर्थ रामदासांचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचाही घोर अधिक्षेप होतो आपल्याकडचे विचारवंत ह्या प्रकरणी मूग गिळून गप्प बसतात हे महाराष्ट्राचे सार्वजनिक जीवन प्रगल्भ आणि स्वाभिमानी असल्याचे लक्षण नाही त्यांचे वाचन वाढेल तेव्हा रामदासांनी महाराजांना जाणता राजा का म्हटले ,त्यासाठी राजांच्या कोणत्या गुणांची वाखाणणी त्यांनी केली हे त्यांच्या लक्षात येईल सुप्रियाताईंमध्ये सुधारणा झाली तर ती हवीच आहे ती वाचनाने होवो ही शुभेच्छा !
महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षात जे गुरुशिष्य संबंध निर्माण झाले त्यातील गुरु आपल्या शिष्यांविषयी काय म्हणतात ते ऐकायची पटोले आणि सुळे ह्यांची मनाची सिद्धता आहे काय ? तसे काही शिवाजी आणि रामदास ह्यांच्यात निर्माण झाल्याचे वाचनात आलेले नाही.असो

अरविंद विठ्ठल कुळकर्णी..

अरविंद उवाच या ब्लॉगवरून साभार..

Leave a Reply