चंद्रपूरमध्ये २ भाजप नगरसेवकांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

चंद्रपूर : ६ मार्च – कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्यात स्थानिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये आताच चढाओढ रंगली आहे. चंद्रपूर महापालिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या दोन नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला आज एक मोठा धक्का बसला. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 4 टर्म नगरसेवक असलेले दिग्गज भाजप नगरसेवक व माजी गटनेते वसंत देशमुख यांच्यासह अन्य एक नगरसेवक प्रशांत घोनमोडे काँग्रेस तंबूत दाखल झाले आहेत.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत शहरातील भिवापूर भागात यासाठी मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. वसंत देशमुख यांना वर्षभरापूर्वी स्थायी समिती सभापतीपद नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी उघड भाजप विरोधी भूमिका घेत पक्षश्रेष्टींवर सातत्याने टीका केली होती.
देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाची म्हणूनच प्रतिक्षा होती. वसंत देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी भाजपचे भ्रष्टाचारी धोरण कारणीभूत असल्याचा प्रहार वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

या पक्ष प्रवेशापासून भाजपचा महापालिकेतला परतीचा प्रवास सुरू झाल्याचीही टिप्पणी त्यांनी केली. आगामी काळात या बहुजन नेतृत्वासह चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply