पाकिस्तानच्या पेशावर मध्ये मशिदीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ जणांचा मृत्यू, ५० जखमी

नवी दिल्ली : ४ मार्च – पाकिस्तानला पुन्हा एकदा दहशतवादानं आपल्या निशाण्यावर घेतलंय. शुक्रवारी पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. शुक्रवारचा नमाज सुरू असतानाच मशिदीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात जवळपास ३६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याचं समजतंय.
पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या (जुमा) नमाजाच्या वेळी एका आत्मघातकी दहशतवाद्यानं गर्दीच्या मध्यभागी स्वत:ला स्फोटकांनी उडवून घेतलं. या स्फोटाच्या झळा अनेक कुटुंबांपर्यंत पोहचल्यात.

या मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानची सर्व मदत पथकं घटनास्थळी रवाना झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय.

घटनास्थळी पोलीस आणि मदत पथक दाखल होण्यापूर्वी परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनीच सुन्न मनानं तत्काळ जखमींना मदत केली. नागरिकांनी आपल्या दुचाकी आणि चार चाकी गाड्यांमधून जखमींना रुग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली.

या घटनेनंतर पेशावर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरलंय. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाकिस्तानवर केलेल्या या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशवतादी गटानं स्वीकारलेली नाही. सध्या पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क असून इतर ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे.

Leave a Reply