मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने कोमामध्ये गेलेल्या गर्भवतीसह बाळाला दिले जीवदान

नागपूर : २ मार्च – भंडारा येथे २२ वर्षीय नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा अपघात झाल्याने ती कोमात गेली. मेंदूमध्ये रक्ताची मोठी गाठ तयार झाली व ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. पॉलिट्रॉमाची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत मेंदूशल्यचिकित्सक व स्त्रीरोगतज्ज्ञांच्या चमूने रुग्ण कोमात असताना प्रसूती करून त्यानंतर मेंदूवर शस्त्रक्रिया केली आणि आईला व त्याच्या नवजात बाळाला जीवदान देत मातृत्वाचे रक्षण केले.
नऊ महिन्याची गरोदर महिला पतीसोबत डॉक्टरांकडे जात असताना तिचा दुर्दैवी अपघात घडला. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. भंडारा येथे प्राथमिक उपचारांनंतर नागपुरात शुअरटेक हॉस्पिटल येथील अतिदक्षता विशेषज्ज्ञ व आयसीयू डायरेक्टर डॉ. निर्मल जयस्वाल यांच्याकडे पाठविण्यात आले. रुग्ण नागपुरात आला तेव्हा फार गंभीर अवस्थेत होता. तिला श्वास घेण्यास त्रास होता व ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होत होते. त्यामुळे मेंदूच्या कार्यान्वयनात अडथळा निर्माण होत होता व रुग्ण डीप कोमाच्या अवस्थेत जात होता.
शिवाय अन्य अवयव निकामी (मल्टिऑरगन फेल्युअर) होण्याच्या धोका होताच. सीटी स्कॅनमध्ये मेंदूमध्ये रक्त जमा झाल्याने गाठ झाली होती व मेंदूवर अंतर्गत सुज आढळली. गर्भारपणामध्ये झालेला अपघात, मेंदूला झालेली इजा, श्वास घेताना होणारा त्रास व पयार्याने कमी होणारा ऑक्सिजन अशा प्रकारची तीव्र जोखिम असताना देखील नातेवाईकांनी उपचारांसाठी तातडीने होकार दिला. जोखमीच्या परिस्थितीमध्ये महिलेची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीपश्चात तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली.
प्रसूती पश्चात तीन ते पाच मिनिटांहून अधिक काळ बाळ रडला नाही, तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो. या परिस्थितीत बाळ जन्मल्यावर रडला नाही. पण बालरोगतज्ज्ञांनी केलेल्या प्रयत्नांनी बाळाच्या जीवाचे रक्षण झाले.
या रुग्णावर मेंदूची शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉ. आलोक उमरेडकर यांनी केली. तातडीने करण्याच्या प्रसूतीसाठी डॉ. श्वेताली देशमुख, जन्मलेल्या बाळावरील उपचारासाठी डॉ. अर्चना जयस्वाल, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भावेश बरडे व सुंगणीतज्ज्ञ डॉ. रवी मुंदडा यांच्यासह शुअरटेक हॉस्पिटलच्या चमूने शर्थीचे प्रयत्न केल्याने केल्याने जीव वाचविण्यात यश आले. दरम्यान गंभीर परिस्थितीची जाणीव असताना देखील या रुग्ण महिलेल्या घरच्यांनी विश्वास ठेवून तातडीने परवानगी दिल्याने उपचारांचा गोल्डन अवर मिळाला व विविध स्पेशालिटीच्या तज्ज्ञांनी एकत्र मिळून केलेल्या उपचाराने रुग्णाला जीवदान मिळाले, असे डॉ. जयस्वाल यांनी सांगितले.

Leave a Reply