संभाजीराजे यांना वाटत असेल की आपला विजय झाला आहे; तर तो आनंद क्षणभंगुर – चंद्रकांत पाटील

पुणे : १ मार्च – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण केलं होतं. अखेर तिसऱ्या दिवशी सोमवारी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
“मराठा समाजाच्या मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ मंजूर केल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीचे सरकार त्याची अंमलबजावणी करण्यात कुचराई करत असल्याने छत्रपती संभाजीराजे यांना आंदोलन करावे लागले. राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि संभाजीराजे यांचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला आहे; तर तो क्षणभंगुर आनंद आहे,” अशी टिप्पणी पाटील यांनी केली.
राजू शेट्टी यांचे आंदोलनही संभाजीराजेंच्या सारखेच आहे. शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर भाजपाने आंदोलने केली आहेत. सहज मान्य होण्यासारखे त्यांचे प्रश्न असताना राज्य शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी आणखी काही मुद्द्यांवरून सरकारवर देखील टीका केली. तसेच दाऊद इब्राहिमला मुसक्या बांधून भारतात आणू, असा दावा भाजपाने केला होता पण केंद्रात सत्ता असूनही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते. ही या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, “दाऊदसह आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींना भारतात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि गुन्हे विषयक कायदे अधिक कडक असल्याने त्यात अडसर येत आहेत. तरीही सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत,” असं ते म्हणाले.

Leave a Reply