झालं ते पुरे झालं, आता युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबलंच पाहिजे – संयुक्त राष्ट्र अध्यक्ष

नवी दिल्ली : १ मार्च – रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध अद्याप थाबायचं नाव घेत नाहीये. रशियन फौजा युक्रेनमध्ये शिरून हल्ले करत असताना जागतिक पातळीवर या युद्धाबाबत नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याविषयी मोठी चर्चा सुरू आहे. काही देशांनी युक्रेनला थेट पाठिंबा दिला आहे तर काही देशांनी याबाबत तटस्थ भूमिका ठेवली आहे. संयुक्त राष्ट्रात युक्रेनच्या बाजून झालेल्या मतदानामध्ये भारत अनुपस्थित राहिला होता. मात्र, आता खुद्द संयुक्त राष्ट्रांनीच “झालं ते पुरे झालं” असं म्हणत या संपूर्ण प्रकरणावर कठोर शब्दांत भूमिका मांडली आहे.
संयुक्त राष्ट्रांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी तातडीची बैठक बोलावली होती. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात फक्त ११व्यांदा अशी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरेस यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केली.
“झालं ते पुरे झालं. आता युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबलंच पाहिजे”, असं अँटोनियो गुटेरेस म्हणाले आहेत. “आता सैनिकांनी पुन्हा त्यांच्या बरॅक्समध्ये परतायला हवं. नेत्यांनी शांतता ठेवायला हवी. सामान्य नागरिकांचं रक्षण व्हायलाच हवं”, असं ते म्हणाले.

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी रशियाच्या न्यूक्लीअर फोर्सला सज्ज राहाण्याचे आदेश दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर गुटेरेस यांनी भूमिका मांडली आहे. “अण्वस्त्रांच्या वापराचं कोणत्याही पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही. सध्या फक्त बंदुका बोलत आहेत. पण चर्चेचा मार्ग कायम खुला राहायला हवा”, असं देखील ते म्हणाले.
२४ फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनमध्ये हल्ला सुरू केला. आज युद्धाचा सहावा दिवस असून अजूनही रशियानं हल्ला मागे घेण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी आपल्या फौजांसह युक्रेनमध्येच राहून रशियन सैन्याचा प्रतिकार करण्याचा ठाम निर्धार केल्यामुळे आता युद्ध शिगेला पोहोचलं आहे. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीवपर्यंत धडकल्या आहेत. कीवमधील अनेक ठिकाणी रॉकेट्सने देखील हल्ले केले जात आहेत.

Leave a Reply