बकुळीची फुलं : भाग १७ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

१९५९ . त्यावेळी मी एलएडी कॉलेजमध्ये प्री युनिव्हर्सिटीला होते . कॉलेज चांगलंच लांब होतं घरापासून . माझी घराजवळ राहणारी श्रीमंत मैत्रीण आणि मी दोघी बसने कधी तिच्या गाडीने जात होतो . बर्डी पर्यंत जाणारी एक बस आणि नंतर दुसरी . तसे दोन्ही मिळून पाच आणलेच लागायचे . तिचा पिरेड असला तर मी लवकर निघून बर्डी पर्यंत पायी यायची . असे दोन तीनदा पैसे वाचले की तिने दिलेल्या अनेक वस्तूंचं ऋण मी तिला काहीतरी खायला घालून फेडायची . त्यावेळी माझ्याकडे दोनच
पांढ-या रंगाच्या बारीक किनार असलेल्या एम्प्रेस मीलच्या दहादहा रुपयांच्या साड्या होत्या . तिच्या घरी कार होती . आमच्याकडे एक जुनी सायकल होती . तिच्याकडे प्रिंटेड कलरफुल साड्या होत्या, खायला भरपूर पदार्थ होते . पण तरीही आमचं छान जुळलं होतं . तिच्या मोठ्या बहिणींचं माझं सख्य अधिक होतं.
त्यावेळी कॉंग्रेस हा सर्वात मोठा राजकीय पक्ष होता . जनमानसावर मा. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं अधिराज्य होतं . त्यावेळी मी गीता मंदिराजवळ असलेल्या कॉंग्रेसच्या सेवादलातही जात होते. सुभगाबाई काशीकर त्यावेळी तिथे होत्या.
कॉंग्रेसच्या अधिवेशनाची भव्य तयारी सुरू झाली होती. आताचं कॉंग्रेस नगर हे त्यावेळी अधिवेशनासाठी सज्ज होत होतं . कॉंग्रेस सेवादलात असल्याने मला अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून पाठवण्यात येणार होतं पण त्याच वेळी काही कॉलेजच्या मुलींना आमंत्रित केलं होतं
. मला कॉलेजकडून बहूमानाने जाणं पसंत होतं . तीन दिवस अधिवेशन स्थळी मुक्काम होता . आईनी बजावून सांगितलं . “पडेल ते काम करायचं , कशाला नाही म्हणायचं नाही .”
हातात एक हातानी शिवलेली कापडी पिशवी , त्यात वहीतले कोरे कागद घेऊन त्याची केलेली डायरी वर काढलेली सुबक नक्षी असलेली डायरी आणि एक फौउंटन पेन दिलं. आणि म्हणाली
” ह्या अधिवेशनात सर्व मंत्री येतील , लता मंगेशकर येणार आहे शिवाय देशाचे पंतप्रधान येणार आहेत . त्यांच्या स्वाक्षरी घे . स्वाक्षरी घेतली की त्यांच्या शुभेच्छा ही येतात बरोबर, आणि धांदरटपणा करू नकोस “
कॉलेजच्या आणखी तीन मुली माझ्या सोबत होत्या . पण त्यांच्या आईनी असं काही सांगितलं नव्हतं. मला मनातून आईचा रागच आला . साडीचा पदर सांभाळायचा की ती पिशवी पेन ? साडीला पीन लावायची असते हे त्यावेळी ठावूकही नव्हतं .
मैत्रिणी सोबत होत्या, आमच्या एक प्राध्यापक ही होत्या . त्यांना सकाळचा ब्रेकफास्ट, मंत्री लोकांना देण्याची जबाबदारी होती. तिने आम्हा चौघींना आपल्या हाताशी घेतलं. आम्हाला शाही लोकांना वाढायला मिळणार हे आमचं भाग्यच होतं .
आचारी पदार्थ तयार करून टेबला पर्यंत आणत होता. आमच्या प्राध्यापिका जातीने लक्ष देत होत्या . त्या आम्हाला म्हणाल्या.
” हे बघा, तुम्ही आणि आणखी चार जणी आहात . एकमेकांनी एकेक पदार्थ वाढा.
अगोदर त्यांना बसू द्या, मग गरम गरम वाढा. आणि तू ग फडणवीस, अगोदर पदर आडवा घेऊन कमरेला खोच . ती पिशवी टेबला वर ठेव . आणि हे लाडवाचं वाटं हातात घे. “
मी पदर खोचला . दोन वेण्या मागे केल्या . आणि पिशवी त्यांच्या समोर काढून ठेवली .
आणि लोक यायची वाट पहात उभी राहिले .प्रथम आले ते जवाहरलाल नेहरू . त्यांच्याच मागे अनेक मंत्री आले . मी केवळ ओळखत होते ती लालबहादूर शास्त्री. आणि जवाहरलाल नेहरू यानांच . जवाहरलाल नेहरू अतिशय सुंदर दिसत होते गुलाबी गोरा रंग , त्यावर घातलेला नेहरू सदरा , जाकीट आणि चुडीदार पायजमा . ह्यापूर्वी पाहिलेली सुंदर व्यक्ती म्हणजे माझे वडील .. क्षणभर मी हातात लाडवांचं भरलेलं बाऊल घेऊन उभी होते .
दुस-याचं क्षणी आईने सांगितलेल्या स्वाक्षरी ची आठवण झाली .मी ती पिशवी डाव्या हातात धरली . बाऊल उजव्या हातात आणि इतरांनी वाढल्यावर मी लाडू घेऊन निघाले .
खरं तर मनात अनामिक भिती होती , प्रचंड आदर होता . देशाचे पंतप्रधान आहेत याची जाणीव होती तसंच हीच वेळ आहे स्वाक्षरी घेण्यासाठी याचीही जाणीव होती .मी त्यांच्या टेबला जवळ गेले आणि नकळत माझ्य डाव्या खांद्यावरून माझी वेणी पुढे आली . तशी ती रोजच पुढे असायची. त्यांच्या टेबलावर बाऊल ठेवून वेणी मागे करावी की , पिशवी काढून ठेवावी कळत नव्हतं .. पिशवी ही मनगटावर सरकली होती .
मी बाऊल टेबलावर ठेवावं आणि वेणी मागे टाकावी म्हणून आणि डाव्या हातातील पिशवी उजव्या हातात बाऊल खाली धरावी ह्या उद्देशाने टेबलपर्यंत पोहचले होते. त्यांच्या प्लेट मधे लाडू वाढायचा होता . आणि तेवढ्यात डाव्या हातातली पिशवी उजव्या हातात करतांना प्लेट मधे डायरी आणि पेन पडलं . मला कमालीची भिती वाटली.
त्यांनीच मला मदत केली . लाडवांचं बाऊल स्वतः च्या हातात धरलं. डाव्या हातांनी पेन आणि डायरी मला दिली . तेवढ्यात मी वेणी मागे टाकली . पेन डायरी पिशवीत टाकली . त्यांनी स्वतःच्या प्लेट मधे लाडू वाढून घेतला आणि बाऊल माझ्या हाती दिला . मी संकोचले . माझी तारांबळ पाहून ते हसले . माझी डायरी पेन पाहून माझा उद्देश त्यांच्या लक्षात आला .
मी सर्वांना लाडू वाढले पण माझं स्वाक्षरी घेणं राहिलं होतं . आता दुस-या दिवशी
दुस-या ग्रुपला संधी होती .
माझी संधी गेली , यांचं मला वाईट वाटत होतं . आई काय म्हणेल ही पण काळजी होती . आता त्यांना गाठणं माझ्यासाठी अशक्य होतं.
दुस-या दिवशी सकाळी आम्हाला दुसरं काम देण्यात आलं होतं. मी अस्वस्थ होते . तेवढ्यात एकजण विचारत आला
” कल लड्डू किसने परोसे थे , उसको नेहरू चाचाजीने बुलाया है .”
आमच्या प्राध्यापिकेनी ते ऐकायचाच अवकाश की माझ्यावर शब्दाचा भडीमार सुरु केला .
” तूच लाडू वाढलेलं ना ? काय केलंस असं की त्यांनी तुला बोलवावं .? तरी मी सांगत होते , मोठी माणसं आहेत जरा सांभाळून वागा. काय केलंस तरी काय ग ?”
मी गप्प होते . त्याच माझा हात धरून ओढतच निघाल्या .
अजून अधिवेशन सुरू व्हायला वेळ होता सारेच मंत्री मजेत गप्पा मारत बसले होते. मला पाहताच नेहरूजी म्हणाले.
” हॉं , यही है.”
मला कापरं भरलं . आता काय होणार याचा अंदाज येत नव्हता .
” तुम्हारी वह डायरी हमें दे दो. आपको सिग्निचर चाहिएं थी ना कल ? “
माझ्या आनंदाला पारावार उरला नाही . मी लगेच हातात असलेल्या पिशवीतून ती डायरी आणि पेन काढलं . त्यांनी डायरी घेतली आणि त्यांच्या पार्कर फौऊंटन पेन नी त्यावर झोकात सही केली . ती डायरी मग इतर मंत्र्यांना दिली आणि माझी डायरी
स्वाक्ष-यांनी संपन्न झाली . त्यानंतर आजतागायत मला स्वाक्षरी घेण्याचं वेड आहेच . अजूनही.
मी वयाने वाढत गेले तरी मनातून बालवयात जात मी स्वाक्षरी घेत असते. तुम्हाला आवडतो असा वेडेपणा करायला. ?

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply