त्यांचे समाधान करण्यास कमी पडलो – संभाजीराजेंच्या उपोषणावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

नागपूर : २७ फेब्रुवारी – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि अन्य मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. त्यावर आता काँग्रेसचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांना राज्य सरकारच्या वतीने विनंती सुद्धा केली की, उपोषणावर बसू नये. पण त्यांचे समाधान करण्यास कमी पडलो, अशी कबुली थोरात यांनी दिली आहे.
चंद्रपूर दौऱ्यावर असताना नागपूर विमानतळावर बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी मंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तेव्हा मराठा समाजासाठी कामे झाली आहेत. पण, हे समजावून सांगण्यास आम्ही कमी पडलो. त्यामुळे की काय संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर आंदोलन सुरु केले आहे. संभाजीराजे यांचे समाधान करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरु आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवड तातडीने झाली पाहिजे हे राज्यघटनेत नमूद आहे. त्यात रणनितीचा काही भाग नाही. राज्यपाल यांना त्याबाबत माहिती दिली आहे. तेही मान्य करतील. अधिवेशनात 9 मार्चला अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरली आहे. निश्चितच पण कोणत्याही अडचणी शिवाय अध्यक्षपदाची निवड होईल, अशी खात्री आहे. या संदर्भात मुख्यमंत्री यांच्यासह इतर नेत्यांशी चर्चा झाली आहे. तर, मंत्रीमंडळ विस्ताराबात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही काय धुणीभांडी करायची काय, असा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री जे बोलले ते समजून घेतले पाहिजे. भाजपा ज्या पद्धतीने सत्ता मिळवण्यासाठी यंत्रणेचा वापर करत आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. दबावतंत्राचा उपयोग करून सत्ता मिळवण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न चुकीचे असल्याची टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Leave a Reply