बुलढाण्यातील व्यापाऱ्याने बँकेत भरल्या १९ हजाराच्या नकली नोटा

बुलडाणा : २४ फेब्रुवारी – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर येथे बँकेतील खात्यात रकमेचा भरणा करत असताना सदर रकमेत ५०० रूपयांच्या ३८ नोटा या नकली असल्याचे बँक कॅशियरच्या लक्षात येताच एचडीएफसी बँकेच्या कॅशियरने मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठून खातेदार व खात्यात रकमेचा भरणा करण्याकरता आलेल्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर याबाबत सविस्तर वृत्त असे, की बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एचडीएफसी बँकेत इरफान हनिफ पटणी या व्यापाऱ्याने भरणा केलेल्या नोटांमध्ये १९ हजार रुपयांच्या ५००च्या ३८ नोटा नकली असल्याचं बँक कॅशीयरच्या लक्षात आल्यावर बँक कॅशीयरने मलकापूर शहर पोलीसांत दोन जणांविरुद्ध तक्रार दिली.
तर दिलेल्या तक्रारीवरून इरफान पटणी याच्यासह त्याच्या एका साथीदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरुध्द मलकापुर शहर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 90/2022 च कलम 489 (ब)(क) भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांनी या नकली नोटा कुठून आणल्या याची चौकशी मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply