नक्षल्यांना साहित्य पुरवठा करणाऱ्या ४ नक्षल समर्थकांना अटक

गडचिरोली : २१ फेब्रुवारी – गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या बनावटी शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. अशाप्रकारचे तेलंगणामधून दामरंचा मार्गे छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांना मोठय़ाप्रमाणात साहित्य पुरवठा करणाऱ्या चार नक्षल सर्मथक टोळीचा दामरंचा पोस्टे पार्टी व शिघ्र कृती दलाच्या जवानांनी पर्दाफास करीत चार नक्षल सर्मथकांना अटक केली. राजु गोपाल सल्ला (वय ३१) रा. आसिफनगर, एनटीआर कॉलनि, जि. करीमनगर (तेलंगणा), काशिनाथ उर्फ रवी मुल्ला गावडे (वय २४) रा. भंगारामपेठा ता. अहेरी, साधू लच्चा तलांडी (३0), मोहम्मद कासिम शादुल्ला रा. एनटीआर तामिल कॉलनि, बाबुपेठ, आसिफनगर जि. करीमनगर (तेलंगणा)चा चार आरोपी घटनास्थळावरून अटक करण्यात आली तर छोटू उर्फ सिनू मुल्ला गावडे (रा. भंगाराम पेठा ता. अहेरी) फरार झाला.
नक्षल सर्मथकांकडून नक्षल्यांना स्फोटक व साहित्य पुरवठा करण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील भंगारामपेठा गावात पोलिस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात उपपोलिस स्टेशन दामरंचा पोस्टे पार्टी व शिघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना तेलंगणामधुन दामरंचा मार्गे छत्तिसगड येथे वाहतुक करीत असलेल्या राजू गोपाल सल्ला, काशिनाथ गावडे, साधू लच्चा तलांडी, मोहम्मद शादुल्ला या चारजणांकडून १0 नग कार्डेक्स वायरचे बंडल एकूण ३ हजार ५00 मीटर लांबीचे व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले. तर भंगाराम पेठा येथील रहिवासी असलेला छोटू मुल्ला गावडे फरार आहे. फरार आरोपीचा गडचिरोली पोलिस दलाकडून कसून तपास करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या बनावटी शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. नक्षल सर्मथकांकडुन जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरद्वारे नक्षली बनावटीचे बीजीएल, हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. येत्या टिसीओसी सप्ताह दरम्यान सदर स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडुन मोठय़ा प्रमाणात वापर केला जाणार होता.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे (अभियान), अपर पोलिस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), उपविभागिय पोलिस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात पार पडली.
सदर कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या जवानांचे कौतुक केले आहे. तसेच नक्षलवाद्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणार्या नक्षल सर्मथकांवर कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply