पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तुम्ही हे सगळं बोलताय का? – निर्मला सीतारामन यांचा मनमोहन सिंह यांना सवाल

नवी दिल्ली : १८ फेब्रुवारी – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्ला चढवला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर काँग्रेसने मनोमहन सिंग यांचा पंजाबी भाषेतला एक व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओत मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजपा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘‘तुम्ही स्वत:च्या चुका मान्य करून त्या सुधारण्याऐवजी लोकांच्या प्रत्येक समस्येला देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना दोषी ठरवत आहात. तसेच नेत्यांना बळजबरीने मिठी मारून, झुल्यांवर झुलवून वा बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत’’, असं मनमोहन सिंग म्हणाले होते. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थव्यवस्थेवरून टीका केल्यानं जोरदार निशाणा साधला आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “मनमोहन सिंग यांना भारताला सर्वात कमकुवत बनवल्याबद्दल आणि देशातील महागाई वाढवल्याबद्दल ओळखलं जातं. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. परंतु मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तुम्ही हे सगळं बोलताय का?,” असा सवालही त्यांनी केला.
‘देशातील परिस्थिती गंभीर असून करोनाच्या काळातील केंद्राच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे अर्थव्यवस्थेची दुरवस्था झाली आहे, लोकांना महागाई आणि बेरोजगारी सहन करावी लागत आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत, गरीब आणखी गरीब होऊ लागले आहेत. साडेसात वर्षे सरकार चालवल्यानंतरही स्वत:च्या चुकांचे खापर पं. नेहरूंवर टाकले जात आहे’, असे मनमोहन सिंग म्हणाले.
“राजकीय स्वार्थासाठी लोकांना जातीच्या-धर्माच्या नावाखाली, प्रांता-प्रांतात भेद निर्माण करून फूट पाडली जात आहे. लोकांना एकमेकांमध्ये लढवले जात आहे. मोदी सरकारचा राष्ट्रवाद बनावट आणि पोकळ आहे इतकेच नव्हे, तर धोकादायकही आहे. फोडा आणि राज्य करा, या ब्रिटिश नितीवर ‘राष्ट्रवाद’ टिकलेला आहे. लोकशाहीवर मोदी सरकारचा विश्वास नसून घटनात्मक संस्था कमकुवत केल्या जात आहेत,” अशी टीकाही सिंग यांनी केली.

Leave a Reply