ओंजळीतील फुलं : २९ – महेश उपदेव

18 feb sudhir joshi

सुसंस्कृत नेतृत्व

शिवसेने मध्ये सुसंस्कृत व सुशिक्षित युवकांना प्रोत्साहन देणारे नेते म्हणून सुधीर भाऊ जोशी यांच्या कडे बघितले जाते, मला नेहमी त्यांचे मार्गदर्शन मिळायचे ,मला काही अडचण आल्यास मी निसंकोच पणे त्यांची मदत घेत होतो, ते पण आपला मुलगा समजून मार्गदर्शन करायचे.सुधीर भाऊ च्या निधनाची वार्ता मला मिळताच जबरदस्त धक्का बसला.
१९९३मध्ये माझी ओळख शिवसेना नेते स्व मधुकर सरपोतदार दादांनी करून दिली, त्यानंतर मी सुधीर भाऊंच्या संपर्कात होतो, या दरम्यान भाऊ नागपूर ला आले की त्यांचा मला निरोप यायचा , मी लगेच भेटायला जायचो, स्थानीय लोकाधिकार मुळे गजानन किर्तिकर यांच्याशी माझा पारिचय झाला, गज्याभाऊ व सुधीर भाऊ माझ्या घरी येवून गेले,

सुधीरभाऊ या नावाने शिवसेना कार्यकर्त्यां मध्ये आदराचे स्थान होते. संस्कृत व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता म्हणजे सुधीरभाऊ जोशी होय.मराठी माणसांच्या हक्कासाठी खऱ्या अर्थानं स्थापन झालेल्या शिवसेनेला लोकाभिमुख करण्याचे काम स्थानीय लोकाधिकार समितीने केले. या समितीची पूर्ण धुरा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी सुधीरभाऊकडे सोपवली सुधीरभाऊ यांच्यासोबत सुशिक्षित शिवसैनिकांची फळी होती… बाळासाहेबांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. आणि लोकाधिकार समितीची पाळेमुळे सर्व आस्थापनात आणि लोकांच्या मनामनात रूजवली. मराठी माणसांना त्याच्या मायभूमीत नोकरी मिळायलाच हवी असा आग्रह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. त्याची परिपूर्ती सुधीरभाऊ यांनी केली… देशभरातील अनेक सरकारी निमसरकारी आस्थापनांची कार्यालये मुंबईत होती. त्यात मराठी टक्का वाढवण्याचे काम सुधीरभाऊ यांनी केले.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेची पहिल्यादा सत्ता आल्यावर मुख्यमंत्री झालेले मनोहर जोशी हे सुधीरभाऊ यांचे सख्खे मामा. आपला भाचा नेमका काय करत असे कुतूहल असलेल्या मामाची(मनोहर जोशी) बाळासाहेबांसोबत सुधीरभाऊ यांनी भेट घडवून दिली, सुधीर भाऊ एमए.एलएलबी(MA. LLB.) होते बाळासाहेबांना भलतेच कौतुक असायचे. सुधीरभाऊंच्या कामाची गती पाहून बाळासाहेबांनी त्यांना 1968 साली नगरसेवकाचे तिकीट दिले. मुंबई महानगरपालिकेतील गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम पाहिले… 1973 मध्ये मुंबईचे ते सर्वांत तरुण महापौर झाले होते.
१९९५ मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार राज्यात आले,त्यावेळी सुधीर भाऊ राज्याचे महसूल मंत्री झाले,
. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाला पहिली पसंती होती… मात्र राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो…तेच घडले आणि सुधीरभाऊ केवळ मंत्रिपदापर्यंतच मजल मारू शकले.सत्तेत असताना त्यांनी बाळासाहेबांच्या आदेशानुसार स्वतंत्र ‘रोजगार खाते’ सुरू केले… केवळ राजकारणात न रमता त्यांनी समाजकारण करताना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, दादर सार्वजनिक वाचनालय, बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना अशा अनेक आघाड्यांवर स्वतःची छाप उमटवली… त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात नेहमी स्वतःला प्रसिध्दीपासून दूर ठेवले… आजच्या राजकारणात असा नेता मिळणे विरळाच. लोकाधिकार सामितीचे कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेत उभे राहिले. भीषण अपघातानंतर आणि आजारपण यामुळे त्यांनी १९९९मध्ये सुधीरभाऊंनी सक्रीय राजकारणातून स्वतःहून निवृत्ती घेतली. आणि त्यानंतर पक्षाची कोणत्याही पदाची जबाबदारी न घेता ते शिवसेनेचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहिले… शिवसेना ज्या काळात राजकीय पटलावर वाढत होती तेव्हा हा चेहरा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यात मग्न होता.
सुधीर भाऊनी संपूर्ण विदर्भ पिंजून काढला होता, १९९५ मध्ये युतीची सत्ता आली त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
विविध सरकारी – निम सरकारी आस्थापनातील, बँकामधील आणि तेव्हाच्या कॉर्पोरेट कार्यालयातील अधिकारी मंडळी शिवसैनिक होती ती सुधीरभाऊंमुळेच… याचे श्रेय बाळासाहेबांनी नेहमीच त्यांना दिले…
आज हा सच्चा-सुसंस्कृत चेहरा काळाच्या पडद्याआड झाला असला तरी शिवसेनेच्या इतिहासाचा खरा साक्षीदार असलेला नेता कायम स्मरणात राहिल.
सुधीरभाऊ जोशी यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

महेश उपदेव

Leave a Reply