अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात बालसंरक्षण पथकाला यश

नागपूर : १७ फेब्रुवारी – बालसंरक्षण पथकाने वेळीच दखल घेतल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश आले आहे. नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र बालसंरक्षण पथकाला या लग्नाच्या संदर्भात माहिती मिळाली होती. त्यामुळे पथकाने एक दिवस आधीच कारवाई करत अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा प्रयत्न उधळून लावला आहे.
महिला व बाल कल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या आदेशाने बाल संरक्षण अधीकारी, कर्मचारी पाचगाव मध्ये विवाह सोहळा होत असलेल्या स्थळी पोहचले. वधुपित्याला मुलीचा जन्मदाखल मागितल्यावर मुलीचे वय १७ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील जामगाव येथील असून पाचगाव येथे तिच्या मानलेल्या मामाकडे हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. पथक पोहचले तेंव्हा मुलीला हळद लागत होती. अल्पवयीन मुलीचा विवाह करणे हे कायद्याने गुन्हा असल्याचे मुलीच्या पालकांना समजवून सांगितले, त्यानंतर वधुपित्याने लग्न सोहळा रद्द केला.
गेल्या वर्षभराच्या काळात मोठ्या प्रमाणात बाल विवाह करण्याचे प्रयत्न बाल संरक्षण पथकाच्या सतर्कतेमुळे टळले आहेत. उपलब्ध आकडेवारी नुसार 12 पेक्षा बाल विवाह रोखण्यात बाल संरक्षण पथकाला यश मिळाले आहे.

Leave a Reply